Maharashtra Political Crisis: श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ भाजपकडे जाणार? मुख्यमंत्री म्हणाले, “अमित शाहांना सांगितलंय की...”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 09:31 PM2022-09-07T21:31:28+5:302022-09-07T21:35:31+5:30
Maharashtra Political Crisis: मिशन महाराष्ट्र अंतर्गत भाजप आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या जागेवरच दावा करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Maharashtra Political Crisis: आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, मागील वेळेस थोडक्यासाठी पराभव पत्कराव्या लागलेल्या देशभरातील अनेक मतदारसंघावर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री कामाला लागले आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात एन्ट्री करत यावर भाजप दावा करणार असून, हा मतदारसंघ भाजपकडे जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत आपले मत व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपचे सध्या मिशन महाराष्ट्र सुरू आहे. भाजपने प्रामुख्याने १६ लोकसभा मतदारसंघ टार्गेट केले आहेत. यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे भाजप आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या जागेवरच दावा करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना, कल्याण डोंबिवलीबाबत सुरू असलेल्या चर्चेची मला माहिती नाही. परंतु आगामी काळातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र युती म्हणून लढू. शिवसेना-भाजप युती असेल, असे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले असल्यामुळे आम्ही सगळ्या निवडणुका युतीतच लढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उरलेली शिल्लक सेना असेल तर...
एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाबाबत भाष्य केले. आमच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ओरिजिनल शिवसेना आहे. त्यांचे जे लोक आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही कशाला दावा करणार?, उरलेली शिल्लक सेना असेल तर एकनाथ शिंदे आणि आम्ही ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. आमचे मिशन महाराष्ट्र आहे, आमचे मिशन इंडिया आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते, महाराष्ट्राबाहेर नाही, असे म्हणत फडणवीस यांनी राष्ट्रवादीला थेट इशारा दिला आहे.