Maharashtra Politics: “आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली”; भारत-पाक सामन्यावरुन CM एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 01:04 PM2022-10-24T13:04:40+5:302022-10-24T13:06:07+5:30
Maharashtra Politics: मेलबर्नमध्ये बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान (IND VS PAK) सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे अवघड आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानेपाकिस्तानवर विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने देशवासीयांची दिवाळी गोड झाली. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया आल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारत-पाकिस्तान सामन्यावर भाष्य केले. आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली, असा टोलाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्याची जोरदार चर्चा अद्यापही सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या सामन्यामुळे प्रभावित झाल्याचे सांगितले जात आहे. टीम इंडियाने एक मॅच जिंकली. तशीच मॅच आपण तीन साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलीय, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ठाण्यात दिवाळी निमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच एकनाथ शिंदेंनी खोचक टोले लगावले.
मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली
टीम इंडिया जिंकली हा आनंदाचा क्षण आहे. तोही उत्सव आहेच. तुम्ही पाहिले असेल मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले. आम्ही तीन साडेतीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि ती जिंकली. या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली लोकांच्या मनातील राज्य आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आल्या आल्या आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विकासाबरोबर या गोष्टी आवश्यक आहे. माणसाचे मन आनंदी असेल तर ऊर्जा प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जाता येते. या राज्यात परिवर्तनाचे पर्व सुरू झाले आहे. हे विकासाचे पर्व असेल. या राज्याचा आपल्याला विकास करायचा आहे. जिथे जातो तिथे लोक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांतर भाष्य करताना, ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपला ३९७ जागा मिळाल्या. शिवसेनेला २९८ जागा मिळाल्या. आपले सरपंच निवडून आले. ही चांगली नांदी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"