“फडणवीस एक्सपर्ट खेळाडू, कधी कोणाची विकेट काढतील, क्लीन बोल्ड करतील सांगता येणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 04:42 PM2023-07-01T16:42:59+5:302023-07-01T16:43:12+5:30
Eknath Shinde Vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनीच शरद पवारांना क्लीन बोल्ड केले. कारण ते मविआ सरकारचे प्रमुख होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
Eknath Shinde Vs Sharad Pawar: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. यावर आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस एक्सपर्ट खेळाडू आहेत, ते कधी कुणाची विकेट काढतील, हे सांगता येणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांनी आमच्याबरोबर डबलगेम केला त्यामुळेच आमचं सरकार येऊ शकले नाही. सगळी चर्चा शरद पवारांशीच झाली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर शरद पवार यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच सांगितले की, दोन तीन दिवस आधी भूमिका बदलली. जर दोन दिवसांमध्ये मी भूमिका बदलली तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली? माझे एक सासरे होते, ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दित अनेक मोठ्या मोठ्या प्लेअर्सच्या विकेट घेतल्या होत्या. क्रिकेट खेळलो नसलो तरी गुगली कसा टाकतात हे मला माहिती आहे. त्यांनी विकेट दिली तर विकेट घेतलीच पाहिजे, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
फडणवीस एक्सपर्ट खेळाडू, कधी क्लीन बोल्ड करतील सांगता येणार नाही
देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. एकंदरीत शरद पवार साहेबांनी मान्य केले की, त्यांनी गुगली टाकली होती म्हणून. कारण ते एकाच वेळी अनेक ठिकाणी गुगल्या टाकत होते. खरे म्हणजे महाविकास आघाडी सरकार घालवले आणि युतीचे सरकार आले. त्यात देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांना क्लीन बोल्ड केलेलेच आहे. कारण ते त्या मविआ सरकारचे प्रमुख होते. मी एवढेच सांगेन की, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा एक्सपर्ट खेळाडू आहेत ते कधी कोणाची विकेट काढतील, कोणाला क्लीन बोल्ड करतील हे काही सांगता येणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.