Maharashtra Politics: २०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्रीपदी असणार का? एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 09:30 PM2023-02-25T21:30:10+5:302023-02-25T21:31:03+5:30
Maharashtra News: घरातून फेसबुकवरुन संवाद साधून राज्याचा विकास होत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच आगामी काळात विविध ठिकाणच्या महानगरपालिका, लोकसभा, राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. जवळपास सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. भाजप यामध्ये आघाडीवर आहे. यातच २०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार का, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, त्यांनी सूचक विधान केले.
महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमाकांचे राज्य आहे. महाराष्ट्राचा जीडीपी १५ टक्के आहे. महाराष्ट्राची निर्यात २५ टक्के इतकी आहे. थेट परकीय गुंतवणूक १७ ते २० टक्के आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे आम्ही काम करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एबीपीच्या एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांना २०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
२०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्री असणार का?
यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हे पाहा, हे सर्व जनतेच्या हातात असते. कुणाला मुख्यमंत्री करायचे आणि कुणाला मुख्यमंत्री पदावरून हटवायचे, याचा निर्णय जनताच घेत असते. आम्ही काम करणार आहोत. आम्हाला दिवस रात्र एक करून काम करायचे आहे. आज आम्ही राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारत आहोत. आम्ही आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शेती आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात काम करत आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्राचा विकास करू इच्छित आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबतच्या प्रश्नावर अधिक प्रतिक्रिया देणे टाळले.
फेसबुकवरून संवाद साधून राज्याचा विकास होत नसतो
महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. डबल इंजिनचे सरकार असल्याने राज्य वेगाने प्रगती करत आहे. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. राज्यात अनेक प्रकल्प नव्याने सुरू केले आहेत. केंद्र सरकारसोबत हातात हात घालून काम करत आहोत. केंद्र सरकारसोबत योग्य पद्धतीने संवाद साधल्यानंतर ते राज्यांना मदत करतात. त्यासाठी घरातून बाहेर पडले पाहिजे. घरातून फेसबुकवरून संवाद साधून विकास होत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
दरम्यान, २०१९ साली शिवसेना-भाजप युती म्हणून आम्ही लोकांसमोर गेलो. त्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून मते दिली. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत स्वार्थी आणि लालची भावनेने युती तोडून सरकार स्थापन केले. २०१९ ला झालेली चूक सुधारायची होती. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला. मला मुख्यमंत्री देखील व्हायचे नव्हते. परंतु, २०१९ ची चूक सुधारण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि मी मुख्यमंत्री झालो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"