"शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले, त्याचीच फळे भोगत आहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:41 PM2022-08-01T12:41:03+5:302022-08-01T12:41:42+5:30
अनेक कडवट शिवसैनिक ज्यांना पक्षात काही मिळालं नाही. ते बाळासाहेबांना दैवत म्हणून जगले आज त्या शिवसैनिकांना त्रास होतोय. संजय राऊतांसारखे लोक अशा कडवट शिवसैनिकांना विकायला निघाले असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.
मुंबई - संजय राऊतांवर जी कारवाई सुरू आहे ती मागील ४-५ महिन्यापासून सुरू आहे. त्यांना ईडीने अनेकदा नोटीस पाठवली. काही नोटिसींना ते गैरहजर राहिले. ईडीने कायदेशीर प्रक्रियेतून ही कारवाई केली. संजय राऊतांच्या घरी जे पैसे सापडले ते समजून जा शिंदेंनी दिले. अयोध्याला जाऊन किती महिने झाले? तुम्ही हे पैसे पक्षाला परत करायचे होते? याचा अर्थ संजय राऊतांना ते पैसे ठेवायचे होते असा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावला.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, काल ईडीच्या कारवाईवेळी संजय राऊत जे हातवारे करत होते ते अतिशय चुकीचे होते. ईडीची कारवाई सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरही झाली. परंतु अशा अविर्भावात ते वागले नाहीत. संजय राऊतांना त्यांची लायकी आज कळेल. ज्यांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्या कर्माची ही फळे आहेत. संजय राऊत हा त्यांचा प्यादा होता या प्यादाचे काम आता संपलं आहे. शिवसेना फोडण्याचं काम राऊतांनी केले. संजय राऊत शिवसेनेसोबत होते की, राष्ट्रवादीसोबत होते हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होते असं शिरसाट यांनी सांगितले.
तसेच अनेक कडवट शिवसैनिक ज्यांना पक्षात काही मिळालं नाही. ते बाळासाहेबांना दैवत म्हणून जगले आज त्या शिवसैनिकांना त्रास होतोय. संजय राऊतांसारखे लोक अशा कडवट शिवसैनिकांना विकायला निघाले. नाशिकला जाऊन पाहा, संजय राऊतांबद्दल काय बोलले जाते. तुम्ही फक्त सामनात छापू शकता परंतु जनतेच्या मनावर छापू शकत नाही. तुम्ही शिवसेना फोडली त्या पापाची फळे भोगावी लागत आहेत असंही शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
दरम्यान, शरद पवार हे राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम करतात. शिवसेनेत आम्ही उठाव केला त्याचा सर्वाधिक आनंद शरद पवारांना झाला असेल. शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊतांचा वापर शरद पवारांनी केला. संजय राऊतांचे काम संपले. मातोश्रीवर कुठला मोठा नेता येतो? जो हेतू साध्य करायचा होता तो झाला. त्यामुळे मातोश्रीवर कुणीही जावो फरक पडत नाही. शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे घर फोडण्याचं काम या कपटी लोकांनीच केले. आमचा उठाव चांडाळ चौकडीविरोधात होता. यांना दूर करा अन्यथा भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही असंही संजय शिरसाट म्हणाले.