“बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 01:58 PM2024-01-13T13:58:30+5:302024-01-13T14:00:54+5:30
CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरे यांचे राम मंदिराचे प्रेम बेगडी आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.
CM Eknath Shinde News: आमदार अपात्रता प्रकरणाी निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर असताना, शिंदे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली. या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच शब्दांत पलटवार केला. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला.
कल्याणमध्ये काय होणार ? घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील. म्हणजे वापरा आणि फेका. हे धोरण. हे गद्दार कचऱ्याच्या टोपलीत जाणार. नाही गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला. गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालण्यासाठी चाललो आहे. आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते. माझ्या माहिती प्रमाणे ते पुन्हा एकदा ते येणार आहेत. उद्या मकरसंक्रांत आहे. तिळगूळ वाटप सुरु आहे. तिळगूळ घ्या गोडगोड बोला. या लोकसभेच्या निवडणुकीत हुकूमशाहीवर संक्रांत येणार, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.
बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात
लोकशाहीत दौरा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी. जे स्वतःचे कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत. ज्यांनी केवळ माझे कुटुंब माझी जवाबदारी पाहिली. ते यावर बोलत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या नेत्यांना, सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ते आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. उद्धव ठाकरे यांचे राममंदिराचे प्रेम बेगडी आहे. हेच म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नहीं बतायेंगे. पण मोदींनी मंदिर पण तयार केले आणि तारीख पण जाहीर केली. राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. तो राजकीय विषय होऊ शकत नाही. तसेच मोदी यांनी काळाराम मंदिर स्वच्छ केले तसेच मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन केले, त्यानुसार राज्यातील मंदिर स्वच्छ करणे परिसर स्वच्छ केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही जी डीप क्लीन मोहीम सुरु केली आहे. त्याने ठाण्यातील प्रदूषण कमी झाले आहे. या डीप क्लीन मोहिमेत समाजातील सर्व घटक सहभागी होतात. यातून आम्हाला एक लोक चळवळ निर्माण करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या स्वच्छ भारत मोहिमेतून याची प्रेरणा घेतली. स्वच्छ भारत अभियानाला जसा प्रतिसाद मिळत आहे. तसाच प्रतिसाद महाराष्ट्र मध्ये मिळतो. याने प्रदूषण कमी होण्यास खूप परिणाम झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.