"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 07:58 AM2024-09-30T07:58:43+5:302024-09-30T08:02:53+5:30

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

CM Eknath Shinde response to Uddhav Thackeray criticism of PM Modi Amit Shah | "माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार

"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना महायुती सरकार, भाजपा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. अमित शाह यांनी बंद दाराआडचे धंदे बंद करावे आणि हिंमत असेल तर मैदानात यावे. शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा, असे जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.  मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला आहे.

नागपूरच्या कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. बंद दाराआड झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांना विरोधकांना लक्ष्य करण्यास सांगितले आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टार्गेट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अमित शाह आम्हाला संपवण्यासाठी येणार आहेत. पण आम्हाला केवळ जनता संपवू शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. "काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झालं.  मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते. वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही. लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपयेही तुमच्या डोळ्याला टोचतात. बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही? त्यामुळेच आता मिळतात अगदी तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही, असे हे सांगतात. त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

"कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या, बॉडी बॅगमधूनही कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी? राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हस्ताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे, विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले, हे ध्यानात ठेवा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे जरा काही जणांनी आरशात बघावे," असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

"बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत. या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का, असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला. तुम्ही तुमच्या शिवसेनेचेच हिंदुत्व बासनात बांधले... ते आधी लोकांसमोर कबूल करा," असं आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केलं.
 

Web Title: CM Eknath Shinde response to Uddhav Thackeray criticism of PM Modi Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.