“सुप्रीम कोर्टाचा निर्णय समाधानकारक”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 06:17 AM2022-07-21T06:17:03+5:302022-07-21T06:17:37+5:30
न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सरकार स्थापन करण्यापासून विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यापर्यंत व विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यापर्यंत आम्ही जे केले, ते कायदेशीर असल्यावर सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्याने न्यायालयाचा निर्णय समाधानकारक आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
ठाण्यातील निवासस्थानाहून मुंबईला जाण्यापूर्वी ते बोलत होते. न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले असून, पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. विरोधकांनी सरकारच्या विरोधात जे मुद्दे मांडले होते, त्यात त्यांना दिलासा दिलेला नाही. राज्यघटना, नियमाप्रमाणे सर्व केले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाने जे काम केले, ते योग्य पद्धतीने केले आहे. ओबीसींना न्याय मिळायला हवा, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर परिस्थितीचा रोजच्या रोज आढावा घेतला जात आहे. लोकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी सरकार घेत असून, राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.