Eknath Shinde : "…नाहीतर आमचाच 'कार्यक्रम' झाला असता"; एकनाथ शिंदेंनी सांगितलं नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 03:04 PM2022-07-25T15:04:00+5:302022-07-25T15:13:08+5:30
Eknath Shinde And Shivsena : राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी गळ्यावर हात फिरवत आमचाच 'कार्यक्रम' झाला असता असं म्हटलं आहे.
मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी गळ्यावर हात फिरवत आमचाच 'कार्यक्रम' झाला असता असं म्हटलं आहे.
"मलाही विश्वास नव्हता की मी राज्याच्या मुख्यमंत्री होईल. मात्र सर्व काही घडत गेलं. तुम्ही सर्व टीव्हीमध्ये पाहिलं असेल. तुम्हाला पण धाकधूक लागली असेल. आम्ही सुरुवातीला तीन-चार दिवस झोपलोच नाही. तीन दिवस सतत दिवस-रात्र हा एकनाथ शिंदे एक मिनिट पण झोपला नव्हता कारण खूप टेन्शन होतं" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच "डोक्यात त्यावेळी बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. आम्ही मोठा कार्यक्रम हातात घेतला होता. नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता" असं शिंदेंनी म्हटलं आहे.
"परमेश्वर आमच्या पाठीशी होता. बघता बघता सगळे लोक एक एक करत वाढत गेले. एक दोन नव्हे तर 50 लोक एकत्र आले" असंही शिंदेंनी सांगितलं धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे. धनगर समाज बांधवांवर आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, तसेच ज्या ३ धनगर समाजबांधवांनी आरक्षण आंदोलनात आत्मदहन केले. त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये मदत दिली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
धनगर समाजासाठी जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत देखील लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली. राज्यातील धनगर समाज बांधवांच्या विविध प्रश्न मांडण्यासाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या धनगर बांधवांशी शिंदेंनी रविवारी संवाद साधला.
तुमच्या ज्या काही हक्काच्या मागण्या आहे, त्याला मी नक्की हात घालणार आहे. न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. धनगर समाजाच्या मागण्या आहेत. एक एक काम आपण मार्गी लावू. एक-एक सुविधा देऊ. धनगर समाजासाठी जे काही करायला पाहिजे ते नक्की केलं जाईल, एवढी खात्री बाळगा, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.