मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:21 PM2024-10-16T16:21:54+5:302024-10-16T16:24:19+5:30

Nana Patole slams Mahayuti: "काँग्रेसच्या काळात महाराष्ट्र आघाडीवर होता, गुजरातच्या हस्तकांनी दोन वर्षात राज्याची वाट लावली"

CM Eknath Shinde should talk on rate card instead of report card said Nana Patole | मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र

मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र

Nana Patole slams Mahayuti: विधानसभा निवडणुकींच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड सादर केले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारला टोला लगावला. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपोर्टकार्ड वर बोलणे हास्यास्पद आहे, त्यांनी रेटकार्ड वर बोलले पाहिजे. २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोना महामारीचा सामना करावा लागला, त्या संकटातही महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची दखल देशानेच नाही तर जगाने घेतली. गुजरात, उत्तर प्रदेशात या भाजपा शासित राज्यात मृतदेहांचे ढिग लागले होते, त्यामुळे युती सरकारने पाठ थोपटून घेऊ नये. त्यांची कामगिरी व ओळख फक्त ‘गद्दारी’ व ‘खोके सरकार’ एवढीच आहे," अशी जळजळीत टीका त्यांनी केली.

महायुतीने राज्यावर ९ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला...

"दोन वर्षात महाराष्ट्रात जाती धर्मात तेढ निर्माण करून राज्यात अशांतता पसरवण्याचे काम केले. आरक्षणाच्या नावावर जाती जातीत भांडणे लावली, कायदा सुव्यवस्था अत्यंत खालावली असून जंगलराज झाले आहे. महिला सुरक्षित नाहीत, शाळेत मुली सुरक्षित नाही व सत्ताधारी पक्षाचे नेतेही सुरक्षित नाहीत ही या सरकारची कामगिरी आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सरकारी भरती निघत नाही निघाली तर प्रत्येक परिक्षेचे पेपर फुटतात, तरुणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे एका पिढीचे भविष्य बरबाद करण्याचे काम युती सरकारने केले. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम या सरकारने केले असून राज्यावर ९ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला, हे या सरकारचे काम आहे," असा टोला पटोले यांनी लगावला.

मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पिछाडीवर

नाना पटोले पुढे म्हणाले, "कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एक होता पण फडणवीसांच्या काळात व शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली हे उघड सत्य आहे. आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची गुजरातच्या हस्तकांनी मागील दोन वर्षात मात्र पुरती वाट लावली आहे."

गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप

"या सरकारने दोन वर्षात मोदी-शाह यांच्या आदेशाने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे, महाराष्ट्र हे मोदी शाह यांच्यासाठी फक्त एटीएम आहे. राज्यात प्रस्तावित असलेले मोठे प्रकल्प गुजरात व राज्यात पळवून नेले त्यावेळी शिंदे, फडणवीस व अजित पवार मूग मिळून गप्प बसले होते. फडणवीस यांनी तर गुजरातमध्ये गुंतवणूक होते त्याचे समर्थन केले होते. राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेल्याने महाराष्ट्रात बेरोजगारांची फौज बनली आहे. उद्योगधंदे गुजरातला व गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. मुंबईतील महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घातल्या व टेंडर मागून टेंडर काढून कंत्राटदारांचे भले केले व त्यातून मलई खाण्याचे काम दोन वर्ष बिनबोभाटपणे सुरु आहे," अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: CM Eknath Shinde should talk on rate card instead of report card said Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.