Eknath Shinde : "अन्नदाता शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही"; एकनाथ शिंदेंचं नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 02:20 PM2022-10-25T14:20:29+5:302022-10-25T14:27:15+5:30
CM Eknath Shinde Slams Congress Nana Patole : नाना पटोले म्हणाले की, दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. त्यात दिवाळसण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. यातच आता शिंदे-भाजप सरकार शेतकरीविरोधी असून, दिवाळीनंतर विद्यमान सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात येणार असून, राज्यपालांकडे यासंदर्भात भूमिका मांडली जाणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी सांगितले. पटोलेंना आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"अन्नदाता शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही" असं एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे. "अन्नदाता शेतकरी आज संकटात आहे. त्याला शिंदे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार कायम शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे. आताही आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. आम्ही त्यांना नक्की मदत करू. विरोधी पक्षाचं कामचं टीका करणं आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी टीका केली. त्यांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ" असं एकनाथ शिंदे य़ांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
नाना पटोले म्हणाले की, दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे. राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहे. आम्ही लवकरच राज्यपालांकडे ही भूमिका मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी या ईडीच्या भाजपच्या सरकारने घेतली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा एक रुपयादेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्त झळ सोसावी लागत आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची रोख मदत आणि नंतर १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा केला होता. विद्यमान सरकारने नियमांचे अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांना मदत देत नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. परण शिंदे-भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"