“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 20:10 IST2024-04-27T20:10:31+5:302024-04-27T20:10:43+5:30
CM Eknath Shinde: ठाकरे गट पूर्ण काँग्रेसमय झाला आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती, त्याचा अभिमान बाळगत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
CM Eknath Shinde: बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, काँग्रेससोबत जावे लागेल, त्यावेळी माझे दुकान बंद करेन. मात्र, त्याच बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार, असे जाहीरपणे सांगत आहे. जनाची नाही तरी मनाची तरी लाज ठेवली हवी होती. ठाकरे गट पूर्ण काँग्रेसमय झाला आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती, त्याचा अभिमान बाळगत आहेत. तर दुसरीकडे, आईच्या निधनाचे दुःख बाजूला सारून नरेंद्र मोदी तातडीने देशसेवेत आले, असे पंतप्रधान हवे. आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको. इंडिया आघाडीसाठी सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचार ही धर्म आहे, अशी सडकून टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
कोल्हापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. कोल्हापुरात महापूर आला होता. त्या महापुरात १२ दिवस रस्त्यावर होतो. गर्भवती महिलेची पूरातून सुटका केली होती. महापुरात लोकांना जनावरांना जपणारे कुठे आणि २६ जुलैच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेऊन स्वत: फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठे आहेत, हा फरक सगळ्यांना कळतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
देशाला जगात सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी
धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला. येथील मतदार धनुष्यबाण समोरील बटणावर बोट दाबेल. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत आहे. मोदी विकासासोबत वारसा जपत आहेत. देशाला जगात सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान मोदींजींसोबत आहे. जेवढे जास्त आरोप, टीका कराल, तेवढी अधित जनता मोदींसोबत येईल. २०१४ ला तेच झाले, २०१९ ला तेच झाले आता २०२४ ला तुमचे डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे घर-घर मोदी, मन-मन मोदी आहे. संजय मंडलिक आणि धनंजय माने यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला.