Eknath Shinde : "शिवतीर्थावर शिमगा मेळावा, तेच रडगाणं असेल"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 12:24 PM2023-10-24T12:24:49+5:302023-10-24T12:42:35+5:30
CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray : दसरा मेळाव्या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. शिवसेना नावानंतर ही परंपरा कुणाची हा वाद रंगला आणि अखेर शिंदे गटासाठी आझाद मैदान आणि ठाकरे गटासाठी शिवाजी पार्क निश्चित करण्यात आले. आता गर्दी कुणाची जास्त होते, यासाठी दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. मराठा आरक्षण, ललित पाटील, दुष्काळ, सरकारी योजना यावरून उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्याबरोबरच सरकारने जनतेसाठी केलेल्या उपक्रमांची माहितीच सादर करणार आहेत.
दसरा मेळाव्या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शिवतीर्थावर शिमगा मेळावा, तेच रडगाणं असेल" असं म्हणत ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच "सरकारच्या नावाने, मुख्यमंत्र्यांच्या नावाने, मोदीजींच्या नावाने सकाळपासून ते शिमगा करण्याचं काम करतात. हिंदुत्वाचे विचारह गेले आणि बाळासाहेबांचे विचारही गेले" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"शिवतीर्थावर दसरा मेळावा नसेल तर शिमगा मेळावा असेल"
"दसरा मेळाव्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी चांगलं नियोजन केलं आहे. न भूतो न भविष्यति... अशा प्रकारची विक्रमी, सर्व रेकॉर्ड मोडणारी सभा होणार आहे. सर्वांमध्ये उत्साह आहे. मिळेल त्या वाहनांनी लोक मेळाव्यासाठी येत आहेत. लांबून लांबून लोक याठिकाणी येणार आहेत. शिवतीर्थावर दसरा मेळावा नसेल तर शिमगा मेळावा असेल. सरकारच्या नावाने, मुख्यमंत्र्यांच्या नावाने, मोदीजींच्या नावाने सकाळपासून ते शिमगा करण्याचं काम करतात. त्यामुळे खरं म्हणजे त्यांनी दसऱ्याला मेळावा न घेता शिमग्याला घ्यायला हवा."
"हिंदुत्वाचे विचारही गेले आणि बाळासाहेबांचे विचारही गेले"
"आरोप प्रत्यारोपाशिवाय दुसरं काही नाही, तेच रडगाणं असेल. दुसरं काही नाही. हिंदुत्वाचे विचारही गेले आणि बाळासाहेबांचे विचारही गेले" असं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. न्यायालयीन लढाईपाठोपाठ आता ठाकरे-शिंदे मंगळवारी खऱ्या अर्थाने मैदानात उतरणार आहेत. दसरा मेळाव्यानिमित्त आगामी लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकांचे रणशिंगच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फुंकले जाणार आहे. दोन्ही गटांनी लाखोंच्या सभांच्या नियोजनाची जोरदार तयारी केली आहे.