...पण नियतीच्या मनात वेगळेच होते, तिच्या पुढे कोणाचे चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:02 AM2023-01-20T06:02:11+5:302023-01-20T06:03:03+5:30
उद्धव ठाकरेंचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईचा श्वास कोंडला होता, तो मोकळा करत आम्ही विकासकामांना गती दिली आहे. विकासाला मानवी चेहरा देत आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा त्यांच्या विचारांचा समान धागा होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना मोदी यांच्या हस्ते ज्या कामांचे भूमिपूजन झाले, त्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होऊ नये, असे काही लोकांना वाटत असते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. नियतीसमोर कोणाचेही चालत नाही. जनतेची अपेक्षा आज
पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षाच्या शेवटी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले, आज राजधानीतील कामांचा शुभारंभ होत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.
वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने ज्या गतीने सहा महिन्यांत कामे केली आहेत, त्यामुळे आता उरलेल्या दोन वर्षांत काय होईल, याचा त्रास काही जणांना होत आहे. त्यांना पोटदुखी, मळमळ होत आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना टीका करू द्या, त्यांच्या टीकेला आपण कामाने उत्तर देऊ. टीकेपेक्षा दहापट काम आपण करू.
डबल इंजिनला ट्रिपल इंजिन
केंद्र व राज्यात आपले सरकार आहे. मुंबई महापालिकेतही सत्ता मिळवून मुंबईसह राज्याच्या विकासाचे सध्याचे डबल इंजिन ‘ट्रिपल इंजिन’मध्ये रुपांतरित करणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम आशीर्वादाने मुंबईसह राज्याचा चेहरामोहरा बदलणार, असा निर्धार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
तिकडे ईडीची चौकशी इकडे चहलांचे कौतुक
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशंसा केली. जी २० परिषदेच्या निमित्ताने मुंबईभर वातावरण तयार करणे तसचे मुंबई शहर त्यांनी चमकविले, या शब्दांत त्यांनी कौतुक केले.
काळेपांढरे करणाऱ्यांची दुकाने बंद होणार
मुंबईत मेट्रोचे तीनशे किलोमीटरचे जाळे तयार झाल्यानंतर तीस ते चाळीस लाख वाहनांची वाहतूक कमी होईल. ४०० किमीच्या सिमेंट रस्ते पहिल्या टप्प्यात तर ५०० किमीचे रस्ते दुसऱ्या टप्प्यात होतील व मुंबई खड्डेमुक्त होईल. पण या योजनेतही काही लोक खोडा घालत आहेत. डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीत वारंवार होणारा कोट्यवधींचा खर्च वाचेल, खड्डयांमुळे निष्पाप जीव जाणेही वाचेल, डांबरीकरणाच्या नावाखाली आपले काळेपांढरे करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले.
तीन वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार
मुंबईत पुनर्विकासाचे प्रकल्प राबवून मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्याचाच निर्धार व्यक्त करून शिंदे म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वात येत्या तीन वर्षांत मुंबई, महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. विकासाला विरोध करणाऱ्यांना मुंबईकर ओळखतात. त्यांचा मोदी आणि आमच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असे नमूद करताना गेल्या सहा महिन्यात आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली.
आम्ही त्यांचेच लोक आहोत, आणि मोदी खळाळून हसले
दावोसच्या गुंतवणूक परिषदेत जाऊन आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी हे जगभर किती लोकप्रिय आहेत याचा स्वानुभव सांगितला. लक्झेमबर्गचे पंतप्रधान मला भेटले, माझ्यासोबत त्यांनी फोटो काढला. ‘मी मोदींचा भक्त आहे, आपला फोटो त्यांना दाखवा’ असे ते म्हणाले. जर्मनी, सौदी अरेबियातील नेते भेटले. मला विचारले, आपण मोदींसोबतच आहात ना? मी म्हणालो, आम्ही त्यांचेच लोक आहोत. जे भेटले ते सगळे मोदींबाबतच मला विचारत होते. मोदीजींचा करिष्मा मी बघितला, असा अनुभव शिंदे यांनी सांगितला तेव्हा जनसमुदायातून ‘मोदी, मोदी’ असा
जल्लोष झाला.