CM Eknath Shinde: "जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण…"; आनंद दिघेंच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:41 AM2022-08-26T11:41:19+5:302022-08-26T11:48:12+5:30
CM Eknath Shinde And Dharmaveer Anand Dighe : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरुन आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई - धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचा आज स्मृतीदिन आहे. याच निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरुन आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन" असं कॅप्शन देत मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट शेअर केली आहे. शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आनंद दिघेंचा फोटो आणि त्याबाजूला चारोळी लिहिल्याचं दिसत आहे.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तुमची शिकवण माझ्या मनामध्ये कायम कोरलेली असून मी तुमच्याच तत्वांचे आचरण करत आहे. मी जनसेवेचं व्रत हाती घेतलं असून माझ्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही अशा आशयाची ही पोस्ट आहे.
"उरात भरुनी सदैव आपले स्मरण,
मनामध्ये कोरली आहे कायम आपलीच शिकवण…
करीतो गुरुवर्य आपल्या तत्वांचे आचरण,
जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण…"
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.... pic.twitter.com/S5UoEXUW7Z
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 26, 2022
आनंद दिघे यांच्या पश्चात...
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर ठाण्यात शिवसेना संपली, असे चित्र विरोधकांनी निर्माण केले होते. एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेला सावरण्याचे काम केले. दिघे यांच्या जाण्याने आधार तुटलेल्या शिवसैनिकांना धीर दिला. शिंदे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
२००५ मध्ये ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शिवसेना केवळ एकसंध ठेवली नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत केली. २०१७ साली झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका, तर अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद या सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळाली.