CM Eknath Shinde Maharashtra Tour: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जुलैपासून राज्याच्या दौऱ्यावर, शक्तीप्रदर्शन करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 05:05 PM2022-07-28T17:05:25+5:302022-07-28T17:06:16+5:30

शिंदे गटाच्या उदय सामंत यांनी दिली राज्याच्या दौऱ्याची माहिती

CM Eknath Shinde to conduct tour across Maharashtra planning to meet shivsainiks what is the plan read in details | CM Eknath Shinde Maharashtra Tour: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जुलैपासून राज्याच्या दौऱ्यावर, शक्तीप्रदर्शन करणार?

CM Eknath Shinde Maharashtra Tour: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० जुलैपासून राज्याच्या दौऱ्यावर, शक्तीप्रदर्शन करणार?

googlenewsNext

CM Eknath Shinde Maharashtra Tour: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्या नंतर भाजपाशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदेंच्या मंत्रिमंडळात भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण मंत्रिमंडळ विस्ताराला मात्र मुहूर्त मिळेना. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी आणि महाविकास आघाडीशी असलेले मतभेद उघडपणे मांडल्यानंतर त्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. त्यावरून टीकाही होण्यास सुरूवात झाली. पण याच दरम्यान ३० जुलैपासून मुख्यमंत्री शिंदे राज्यातील ठराविक भागांच्या दौऱ्यावर असणार आहेत. पूरग्रस्त भागाची पाहाणी आणि इतर लोकोपयोगी कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत असे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. असे असले तरी खऱ्या अर्थाने राज्यात शक्तीप्रदर्शन करून जनतेचा आपल्याला पाठिंबा असल्याचे दाखवून देण्यासाठी शिंदे राज्यभर दौरा करणार असल्याची चर्चा आहे.

असा असेल दौरा

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा दौरा ३० जुलैपासून सुरू होणार आहे. ३०, ३१ जुलै आणि २ ऑगस्ट या दिवशी एकनाथ शिंदे मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री औरंगाबाद, सिल्लोड, येवला, वैजापूर पुणे या भागात स्थानिक पातळीवरचे प्रश्न ऐकून, सर्व घटकातील समस्या आणि निवेदनादेखील स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री हे आधी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा घेतील. याचप्रमाणे विकास कामातील आढावा, कार्यकर्ता मेळावादेखील होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचा हेतु साध्य होणार?

मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने सांगत आहेत की ते अजूनही शिवसेनेतेच आहेत. परंतु शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिंदे गटातील आमदारांवर कायम टीका करताना दिसतात. अशा वेळी शिंदे गटातील आमदारांना सर्वसामान्य शिवसैनिकाचा पाठिंबा मिळवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत राज्यभर फिरून सामान्य जनता आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करणं हा शिंदे यांचा मुळ हेतु असल्याची चर्चा रंगली आहे. या दौऱ्यात अब्दुल सत्तार यांच्या भागात एक मेळावा होणार आहे. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री मुक्काम करतील त्यावेळी शिंदे गटाचा नव्हे तर शिवसेनेचा मेळावा होणार आहे असं उदय सामंत यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून, शिंदे गट हा शिवसेनाच असल्याचे बिंबवण्याचा आणखी प्रयत्न शिंदे गटाकडून केला जाईल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Web Title: CM Eknath Shinde to conduct tour across Maharashtra planning to meet shivsainiks what is the plan read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.