CM Eknath Shinde: “अच्छा काम कर रहे हो!”; गुवाहाटीत असताना अध्यात्मिक गुरुंच्या फोनबाबत CM शिंदेंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:47 PM2023-02-02T14:47:48+5:302023-02-02T14:48:26+5:30
CM Eknath Shinde: गुवाहाटीला असताना फोन करणारे अध्यात्मिक गुरू कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुणाबाबत खुलासा केला?
CM Eknath Shinde:एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढत गेला. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा करत नवीन सरकार स्थापन केले. या घडामोडींमध्ये शिंदे आणि ४० आमदार गुवाहाटीला गेले होते. यावरून अनेकदा शिंदे गटाला लक्ष्यही केले जाते. मात्र, यातच आता गुवाहाटीला गेल्यावर काय झाले, याबाबत एकनाथ शिंदे वेगवेगळ्या कार्यक्रमातून खुलासे करताना दिसत आहे. गुवाहाटीला असताना एका अध्यात्मिक गुरुंचा फोन आला आणि त्यांनी चांगले काम करत असल्याचे सांगत आशीर्वाद दिले. गुवाहाटीत असताना अनेकांचे आशीर्वाद लाभले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जालन्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केलेल्या फोनबाबतची आठवण सांगितली. आम्ही जेव्हा गुहाटीला होतो तेव्हा गुरुजींनी मला आशीर्वाद दिले. मल त्यांनी फोन केला. श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणाले, अच्छा काम कर रहे हो, असे सांगतानाच बाकी मी काही बोलत नाही. सर्व तुम्हाला माहिती आहे, असे सूचक वक्तवही एकनाथ शिंदे यांनी मंचावरून केले.
श्री श्री रवी शंकर याचे काम खूप मोठे
श्री श्री रवी शंकर याचे काम खूप मोठे आहे. आम्ही जेव्हा दाओसला गेलो, तेव्हा १ लाख ३७ हजाराची कमाई केली. आम्ही उद्योगाला रेड कार्पेट टाकलाय. गुरुजी दाओसला देखील आले होते. त्यांनी तिथे ही आशीर्वाद दिला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकाच दिवसात अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले. अडीच वर्षात सर्व सण बंद होते. आपले सरकार आले, तेव्हा पुन्हा सण-उत्सव सुरू केले, मोदी सरकारने खूप चांगले निर्णय घेतले. अर्थसंकल्पात सर्वांचा समावेश केला. अर्थसंकल्पातून सुटला असा एकही घटक नाही. मोदी सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, याचा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला.
दरम्यान, आता जलतारा योजना आम्ही सरकारमार्फत राबवली जाईल. जलतारा उपक्रमामुळे शेतीला फायदा होईल. बबनराव लोणीकर पाणीपुरवठा मंत्री होते. त्यांनी चांगलं काम केले. शेतकऱ्यांची आत्महत्या कमी करण्याला आमचे प्राधान्य असणार आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जनतेचे आहे. लोकांचा विकास करणे हाच आमचा ध्यास आहे. आमचा इतर कोणताचा अजेंडा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"