PFI संघटनेवरील बंदीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वागत; समाजकंटकांचे मनसुबे राज्यात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:23 AM2022-09-28T10:23:55+5:302022-09-28T10:24:53+5:30
महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
नाशिक - देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.
पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आलं आहे.
महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाशिकच्या बीएपीएस स्वामीनारायण मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांकरिता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करित आहे.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 28, 2022