"लवकरच काहींना ठाणे सोडून जावं लागेल असं दिसतंय"; संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 12:34 AM2023-07-30T00:34:37+5:302023-07-30T00:35:14+5:30

"हम ताज बदलेंगे... गद्दारोंका राज बदलेंगे.."; राऊतांनी समर्थकांना दिला नवा मंत्र

CM Eknath Shinde will have to soon leave thane as his group is disloyal says Sanjay Raut | "लवकरच काहींना ठाणे सोडून जावं लागेल असं दिसतंय"; संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला

"लवकरच काहींना ठाणे सोडून जावं लागेल असं दिसतंय"; संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला

googlenewsNext

Sanjay Raut vs Eknath Shinde in Thane: शिवसेनेला ज्या शहराने सर्वप्रथम सत्ता दिली, ते ठाणे शहर आहे. गडकरी रंगायतनने आम्हाला साऱ्यांना खूप प्रेम दिलं आहे. आजही तीच निष्ठा दिसून येते. हे वातावरण बघून आता काही लोकांना लवकरच ठाणे सोडून जावं लागेल, असं दिसतंय, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. आज ठाकरे गटाच्या वतीने ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देखील पंतप्रधान मोदी व राज्य सरकारवर तोफ डागली. पण त्यापूर्वी संजय राऊतांनी आपल्या शैलीत शिंदे गटाचा समाचार घेतला.

"आम्ही येथे येणार आणि येतच राहणार आहोत. ठाणे शहर आमचं आहे. हे मर्द लोकांचं शहर आहे. स्व. आनंद दिघेंकडे पाहून आम्हाला हिंमत यायची. ते बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं आम्ही पाहिलेलं आहे. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. संकट आल्यानंतर पळून जाणारे काही नामर्द आपल्याला दिसतात. पण आज ठाण्यात सभेला जमलेली ही आमची मर्दांची फौज आहे," अशा शब्दांत राऊतांनी शिंदे गटाला डिवचले.

"ठाणे शहर आमच्यासोबत आहे. इथली निष्ठा आमच्यासोबत आहे आणि आम्ही इथे वरचेवर येतच राहणार आहोत. हा संदेश देणं गरजेचं होतं म्हणून आम्ही येथे आलेलो आहोत. हम ताज बदलेंगे... गद्दारोंका राज बदलेंगे.. हा संदेश ठाण्यातून देण्यासाठी आम्ही ठाण्यात आलेलो आहोत," असेही राऊत म्हणाले.

देश कोणत्याही एक व्यक्तीचा नसतो! - उद्धव ठाकरे

"देश कोणत्याही एका व्यतीचा असू शकत नाही. आम्हाला विकास हवा आहे, मात्र देशाला गुलाम करणारा विकास आम्हाला नको. २०२४ ला जर बदल केला नाही, तर देश नालायक लोकांच्या हातात जाईल. भारत मातेला आजाद ठेवण्याची शपथ घेऊया. माता भगिनींची इज्जत लुटली जात आहे, मात्र हे सरकार धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे. देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी महिला असून मणिपूरच्या घटनेबाबत त्यांचीही संवेदनशीलता नाही या गोष्टी वेदनादायी आहेत", अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपा सरकारवर केली.

Web Title: CM Eknath Shinde will have to soon leave thane as his group is disloyal says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.