शिवछत्रपतींची शपथ घालतो...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 03:51 PM2022-08-23T15:51:10+5:302022-08-23T15:51:37+5:30
तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात
मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर केले जाईल. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत मुद्दा चर्चेला आला होता.
यावेळी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांना पत्राद्वारे भावनिक साद घातली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी करण्यासाठी शेत शिवार ते बाजारपेठे पर्यंत असणारी संपूर्ण दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले जाईल. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाईल असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना केलेले आवाहन जसच्या तसं...
माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो,
सर्वाना सप्रेम जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.
परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात... हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं....वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय....
लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे... तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की 'रडायचं नाही, लढायचं....'
शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका... आत्महत्या करू नका... मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं....
मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा... जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना... चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया!
जय महाराष्ट्र !
आपलाच,
(एकनाथ शिंदे)
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य