घटनात्मक पेचामुळे वाढलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टेन्शन; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांशी केली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 01:23 PM2022-08-05T13:23:17+5:302022-08-05T13:24:15+5:30
सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाला शह देण्यात यश येईल असं एकनाथ शिंदे आणि भाजपाला वाटत होते.
मुंबई - शिवसेनेत केलेल्या बंडखोरीनंतर आम्हीच शिवसेना असल्याचा दावा सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांकडून केला जात आहे. त्यात आता ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. परंतु प्रकरणाचं गांभीर्य पाहून कोर्टाने घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा विचार सुरू केला आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टात यावर निर्णय होईल. परंतु मुख्यमंत्री शिंदेसह १६ अपात्र आमदारांबाबत कोर्टात न्यायप्रविष्ट बाब असल्यानं त्याचा इफेक्ट मंत्रिमंडळ विस्तारावरही झाल्याचं दिसून येत आहे.
त्यात वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद करत शिवसेनेची बाजू भक्कम केली आहे. कोर्टात सुरू असलेल्या घटनात्मक पेचामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे हायप्रोफाईल केससाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचल्याची बातमी समोर आली. मलबार हिल येथील मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन येथे ही भेट झाली. या भेटीत सुप्रीम कोर्टातील खटल्याबाबतही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाला शह देण्यात यश येईल असं एकनाथ शिंदे आणि भाजपाला वाटत होते. परंतु ठाकरे गटाचे वकिल अॅड. कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करतायत. त्यामुळे आजारी असतानाही मुख्यमंत्री शिंदे निकमांना रात्री उशीरा भेटले. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास उज्ज्वल निकम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी पोहचले. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी होते. या भेटीत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवर चर्चा झाली. सोमवारी सुप्रीम कोर्टात परत सुनावणी आहे, या सुनावणीची कायदेशीर बाजू समजून घेणं, त्याचं घटनात्मक विश्लेषण करणं, प्रकरण पुढे कसं हाताळायचं यावर बराच खल बैठकीत झाल्याचं समजतंय.
खटल्याचा प्रत्येक कायदेशीर कंगोरा समजून घेण्यासाठी खास उज्ज्वल निकम यांना मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या निवासस्थानी बोलावलं होतं, अशी माहिती पुढे येत आहे. शिंदे-ठाकरे वादातल्या साऱ्या याचिकांची पुढची सुनावणी ८ ऑगस्टला होतेय. आम्हीच मूळ शिवसेना, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. तरी न्यायालयीन सुनावणी झाल्याशिवाय पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलीही कार्यवाही करू नका अशा सूचना सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. कपिल सिब्बलांनी सलग दोन दिवस जोरदार युक्तिवाद केला, सिब्बल- अभिषेक मनु सिंघवी इतका प्रखर युक्तिवाद करतील अशी अपेक्षा शिंदे गटाला नव्हती. या युक्तिवादानंतर शिंदे गटाची धाकधूक वाढलीय असंही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळेच कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उज्ज्वल निकमांना बोलावून चर्चा केल्याचं बोलले जात आहे.