ठाकरेंच्या कार्यकाळात बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 11:25 AM2022-07-24T11:25:22+5:302022-07-24T11:25:44+5:30
फडणवीसांच्या कारकिर्दीत पहिल्या दिवसापासून सातत्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु करण्यासाठी मंगेश चिवटे यांनी प्रयत्न केले.
मुंबई - राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षापासून बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा उघडला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करत मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे. २०१४ मध्ये भाजपा सरकारच्या काळात सुरु झालेला कक्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आला होता.
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मंगेश चिवटे यांनीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची संकल्पना मांडली होती. राज्यातील गरजू रुग्णांना मदत करण्याच्या हेतून सरकारच्या माध्यमातून हा कक्ष उभा राहिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिवटे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले होते. पत्रकारितेसोबतच आरोग्य दूत म्हणून मंगेश चिवटे यांनी रुग्णसेवेत काम सुरू केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून मंगेश चिवटे यांनी जबाबदारी सांभाळली.
फडणवीसांच्या कारकिर्दीत पहिल्या दिवसापासून सातत्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु करण्यासाठी मंगेश चिवटे यांनी प्रयत्न केले. ही संकल्पना चांगली असली तरी तिला शासकीय चौकटीत कसं बसवता येईल याचा अभ्यास करून ११ मार्च २०१५ रोजी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर या प्रस्तावात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी मान्यता दिली त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अस्तित्वात आला. या कक्षाच्या माध्यमातून फडणवीस सरकार काळात ५०० कोटींहून अधिक गरजू रुग्णांसाठी खर्च करण्यात आले. ५० हजाराहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला होता.