तुमच्यासाठी धोका पत्करुन शस्त्रक्रिया केलीय, महाराष्ट्र पिंजून काढणार; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 02:34 PM2022-04-30T14:34:29+5:302022-04-30T14:35:00+5:30
तुमच्यासोबत फिरण्यासाठी धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली. आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे.
मुंबई-
तुमच्यासोबत फिरण्यासाठी धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली. आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. तुम्ही संघटनेवर दोर द्या. बाकीचं मी बघून घेतो, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना, जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेना मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
"शिवसेना अंगार आहे त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. गावाची जनतेची कामं घेऊन या. लोकांसाठी कामं करा आणि संघटनेवर जोर द्या. माझ्या दौऱ्याचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"गट प्रमुख, शाखाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या याद्या मला हव्या आहेत. जन्मापासूनच शिवसेनेकडे नवीन तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या. शिवसेना आपल्या वाढवायची आहे. गावागावातील जनतेला आम्ही तुमच्यासोबत आहोत हे त्याला समजू द्या", अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
शिवसेनेला हिंदूद्रोही ठरविण्याचा प्रयत्न
पश्चिम बंगाल, केरळ सारखे आपल्याला हिंदूद्रोही ठरवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ही त्यांची पद्धत आहे. बंगालचं मोठं कर्तृत्व आहे. यावेळी ममता दीदींनी गेल्यावेळेपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी वाद निर्माण करणं ही भाजपाची चाल आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.