CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 02:56 PM2021-05-16T14:56:00+5:302021-05-16T14:57:52+5:30

CoronaVirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला.

cm uddhav thackeray addressed task force about corona situation | CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे

CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टास्क फोर्स सदस्यांशी संवादव्यवस्थापन केल्यास मृत्यूदर कमी करता येऊ शकेल - मुख्यमंत्री

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती अद्यापही बिकट असलेली पाहायला मिळत आहे. कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत मैदानात उतरण्याचे आवाहन केले. (cm uddhav thackeray addressed task force about corona situation)

यावेळी डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर राहुल पंडित उपस्थित होते. कोरोनावर अजूनही हमखास औषध आपल्याकडे नाही. कोविडच्या सुरुवातीच्या काळात  डॉक्टरांमध्ये, सर्वसामान्य माणसांच्या मनात कोविडची प्रचंड दहशत होती, आपल्याला हे कोविडचे युद्ध किती मोठी आणि भयानाक आहे हे जाणवू लागले होते. आपण यावर न डगमगता पाऊले टाकली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. 

कोविड विरुद्धच्या लढाईतल्या सैन्याचा विस्तार 

कोविड विरुध्द ची लढाई लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी "माझा डॉक्टर" म्हणून ज्यांची ओळख आहे त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज  आपल्याला साद घालत आहे. चला, सर्वांच्या सहकार्यातून आपण करोना विषाणुचा नायनाट करूया. रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या कुटुंबाच्या डॉक्टरावर ठेवतात. त्या माझ्या डॉक्टरांनी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या योग्यवेळी, योग्य उपचाराचे शिवधनुष्य उचलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. 

तोक्ते चक्रीवादळासाठी राज्य सरकार सज्ज; उद्धव ठाकरेंची केंद्राला माहिती

तुमच्या या अनुभवाची गरज

आपल्या सगळ्यांना माहित आहे की जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो. आपल्याला आपल्या त्या माझ्या डॉक्टरवर म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरवर खुप विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते, घरातल्या लोकांचे आजार माहित असतात. मला तुमच्या या अनुभवाची गरज आहे, तुमच्या सहकार्याची  आणि सेवेची गरज आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आजही ७० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना आपण रुग्णालयात दाखल करून घेत नाहीत किंवा तसा सल्ला देत नाहीत. त्यांचा घरच्याघरी उपचार करतो, काहीना तर औषधांची गरज न पडता ते बरे होतात. एकीकडे ही स्थिती आहे तर दुसरीकडे आपल्या लक्षात येते की मृत्यूदर वाढतो आहे, मग त्याची कारणे शोधली तर पेशंट उशिरा रुग्णालयात दाखल होतात हे कारण प्रामुख्याने समोर येते. रुग्ण घरच्या घरी अंगावर काही गोष्टी काढतात आणि उशिरा रुग्णालयात दाखल होतात. मला यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्य हवे आहे गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांचे उत्तम उपचार व्यवस्थापन होण्याची गरज यातून पुढे आली आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

व्यवस्थापन केल्यास मृत्यूदर कमी करता येऊ शकेल

रुग्णाची कोविड स्थिती, त्याला असलेल्या सहव्याधी आणि त्याची ऑक्सीजन पातळी लक्षात घेणे, योग्यवेळी त्याला योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करणे, दवाखान्यात दाखल करण्याची गरज असेल तर अंगावर न काढता त्याला त्याच्या गरजेनुसार संबंधित रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करणे या गोष्टी फॅमिली डॉक्टरने करणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीचे गृहविलगीकरणातील रुग्णाचे व्यवस्थापन केल्यास मृत्यूदर कमी करता येऊ शकेल. कोविडमुळे रुग्णांच्या शरीरातील साखर वाढते, त्यात रुग्णास मधुमेह असेल तर स्थिती आणखी बिकट होते हे लक्षात घेऊन रुग्णाच्या रक्तातील साखर मर्यादित आणि स्थिर ठेवणे गरजेचे असते. हे आव्हानात्मक काम आहे, घरच्याघरी रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी घेतलेल्या फॅमिली डॉक्टरांनी याकडे लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा 

जवळच्या जम्बो कोविड केअर रुग्णालयात सेवा द्या

मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या राज्यभरातील सर्व डॉक्टरांना त्यांच्या सेवेचा विस्तार करण्याबाबत  विनंती केली. माझा डॉक्टरांनी त्यांना शक्य असेल तिथल्या, त्यांच्या परिसरातील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये  दिवसाला एक तरी  जाऊन सेवा द्यावी असे  आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे शासनाला सहकार्य तर होईलच पण  आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंदही रुग्णांना मिळेल. राज्य टास्कफोर्समधील सर्व डॉक्टरर्स आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, उपचार पद्धती, औषधांचा वापर, त्याचे परिणाम, दुष्परिणाम सगळ्या गोष्टींवर ते आपल्याशी बोलतील, आपल्या शंकांचे निरसन करतील. मला विश्वास आहे आपण सगळे  चांद्यापासून बांद्यापर्यंतचे "माझा डॉक्टर" म्हणून ज्यांची महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला ओळख आहे ते या लढाईत उतरले तर आपण कोविडला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

फॅमिली डॉक्टरची भूमिका खूप महत्वाची

पावसाळा उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पावसाळा म्हटले की साथीचे आजार आले, लिप्टो आला, मलेरिया आणि डेंग्यु बरोबर ताप, सर्दी, खोकला पडसे आले.  या साथीच्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असल्याचे व त्यात माझा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या फॅमिली डॉक्टरची भूमिका खुप महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील सर्व डॉक्टर्स आपल्या स्वत:च्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सैनिकाप्रमाणे या युद्धात उतरला आहात, शासन तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आवश्यक असलेले सर्व सहकार्य शासन करील, तुमच्या अडचणींची जाणीव आहे त्या सोडवायला शासन प्राधान्य देत आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. तुम्ही देवदुत होऊन लढाईत उतरा, आपण कोविड विरुद्धची ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 
 

Web Title: cm uddhav thackeray addressed task force about corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.