विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंची नावं निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:11 PM2020-05-04T14:11:00+5:302020-05-04T14:42:02+5:30

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक; ११ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत

cm uddhav thackeray and neelam gorhe will be shiv senas candidate for mlc election kkg | विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंची नावं निश्चित

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंची नावं निश्चित

Next

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हेंची नावं निश्चित करण्यात आली आहेत. लवकरच विधानसभेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी लवकरात लवकर आमदार म्हणून निवडून येणं गरजेचं आहे. 

विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्यानं विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल, अशी चिन्हं आहेत. भाजपने तसे संकेत आधीच दिले आहेत. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सहा जागा निवडून येतील, असा दावा केला आहे. आमच्याकडे असलेलं संख्याबळ पाहता सहा जागा निवडून शकतात. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येतील, असं थोरात म्हणाले. या संदर्भात लवकरच तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचे पाच, तर भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी किंवा शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ११ तारखेपर्यंत आहे.

भाजपमध्ये चार जागांसाठी मोठी स्पर्धा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नवी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून नावे निश्चित करणार आहेत. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे हे माजी मंत्री भाजपमध्ये इच्छुक आहेत. खडसे यांचं राजकीय पुनर्वसन होते का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. बावनकुळे यांना संधी दिली जाऊ शकते. काँग्रेसमध्ये एका जागेसाठी १०० हून जास्त इच्छुक आहेत. अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

काय सांगते आकडेवारी?
नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता असेल. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावावर १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोट्या पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे ११२ मतं आहेत.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपला चौथी जागा निवडून आणण्याकरिता चार मतं कमी पडत असली तरी गुप्त मतदान असल्यानं ही मतं मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असं भाजपचे नेते ठामपणे सांगत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी १७४ मते लागतील. विश्वासदर्शक ठरावावर १६९ मतं मिळाली होती. परिणामी महाविकास आघाडीनं जोर लावल्यास सहावी जागा निवडून आणणं शक्य आहे. पण त्यासाठी मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. 

घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

गरीब मजूरांकडून तिकीटाचे पैसे घेऊ नका, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारला विनंती

... तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरु, खासदार जलील यांचा इशारा

Web Title: cm uddhav thackeray and neelam gorhe will be shiv senas candidate for mlc election kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.