ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचं सावकारी कर्जही माफ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 10:21 AM2020-03-09T10:21:41+5:302020-03-09T10:21:50+5:30
सरकारकडून त्या संबंधीत सावकारास रक्कम अदा करण्यात येणार आहे.
मुंबई : मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून, या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. नुकतंच पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
शासन निर्णयानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील, तर सरकारकडून त्या संबंधीत सावकारास रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्जही माफ होणार आहे.
यापूर्वी सावकाराने आपल्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र ही अट आता रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे, त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.