सुशांत सिंह, दिशाच्या हत्येनंतर मला मुख्यमंत्र्यांचे दोनदा कॉल, म्हणाले...; राणेंचा सनसनाटी दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 11:26 PM2022-03-05T23:26:51+5:302022-03-05T23:27:45+5:30
पोलीस चौकशी संपल्यानंतर बाहेर पडलेल्या नारायण राणेंचा खळबळजनक दावा
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली. जवळपास नऊ तास मालाडमधील मालवणी पोलीस ठाण्यात राणे पिता-पुत्रांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर पडलेल्या नारायण राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल खळबळजनक दावा केला आहे.
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनच्या हत्येनंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दोनदा कॉल आला होता. दिशा सालियन प्रकरणात एका मंत्र्याची गाडी तिथे होती, असं बोलू नका, असं मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यावर असं का बोलायचं नाही, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर तुम्हाला पण मुलं आहेत, असं मुख्यमंत्री मला म्हणाले, असा सणसणाटी दावा राणेंनी केला.
सुशांत आणि दिशाच्या हत्येनंतर मला मुख्यमंत्र्यांचे दोन कॉल आले. त्यांच्यासोबत झालेल्या संवादाची माहिती मी पोलिसांना आज दिली. मात्र त्यांनी याची नोंद करून घेतली नाही, असंही राणेंनी पुढे सांगितलं. दिशा सालियनला न्याय देण्याचा, सत्य पुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि शेवटपर्यंत करत राहू, असं राणेंनी सांगितलं.
शरद पवारांना प्रत्युत्तर
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली होती. पण त्यांनी राजीनामा दिला का, असा सवाल करत ईडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्यावर पवारांच्या विधानावर काय बोलावं तेच कळत नाही, असं राणे म्हणाले. दाऊद आमचा मित्र नाही. तो देशद्रोही आहे. त्यानं देशात बॉम्बस्फोट घडवले. त्यात निष्पाप नागरिक मारले गेले. त्या दाऊदशी तुमच्या पक्षातल्या मलिक यांचे संबंध आहेत. म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागत आहोत, असं राणेंनी म्हटलं. पवार माझाही राजीनामा मागू शकतात. आतापर्यंत आयुष्यभर तेच तर केलंय, असा पलटवारही राणेंनी केला.