Coronavirus Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; मोठा निर्णय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 10:51 AM2021-04-02T10:51:06+5:302021-04-02T10:52:37+5:30
Coronavirus Maharashtra Updates:
मुंबई – राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली वाढल्या आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत सध्याच्या घडीला राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ सक्रीय रुग्ण आहे.
कोरोनाचा कहर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, या बैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसत आहे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.(Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to chair a high-level meeting with officials today)
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to chair a high-level meeting with officials today, over the #COVID19 situation in the state. pic.twitter.com/tyLkkoGeVo
— ANI (@ANI) April 2, 2021
...तर राज्यात कठोर लॉकडाऊन
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता कमी आहे परंतु यातून मध्यममार्ग काय काढता येईल यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत बैठका सुरू आहेत. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
राज्यात अंशत: लॉकडाऊन? मॉल, सिनेमागृह, नाट्यगृहे बंद ठेवण्याची शक्यता
मुंबईसह ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणची हॉटेल्स बंद ठेवली जातील. मात्र हॉटेल्सना होम डिलिव्हरी किंवा ‘टेक अवे’ची परवानगी असेल. शॉपिंग मॉल्स १५ दिवसांसाठी बंद ठेवले जाऊ शकतात. खासगी आस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ची सक्ती केली जाईल; मात्र प्रसिद्धीमाध्यमांना यामधून वगळण्यात येणार असल्याचं कळतंय.
महाराष्ट्रात लसीकरणचा उच्चांक
राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात आज आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून एकाच दिवशी ५७ हजार जणांना लसीकरण करून पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहीला आहे. त्यापाठोपाठ मुंबईत देखील ५० हजार जणांचे लसीकरण झाले.