CM Uddhav Thackeray : शेरास सव्वाशेर भेटतोच, आता ती वेळ आलीय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 10:47 PM2022-06-24T22:47:07+5:302022-06-24T22:47:07+5:30
मी या सगळ्यामागे आहे सांगतात, मी एवढा षंढ नाही, मी मागून वार करणारा नाही, उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका.
आसामची राजधानी गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे यामागे भाजपचा हात असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. दरम्यान, यावर भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी आता शेराला सव्वाशेर भेटण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिवसेना नगरसेवकांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी अनके मुद्द्यांवर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. एकदा म्हणायचं निधी देत नाही, मुख्यमंत्री भेट देत नाही, काँग्रेस मदत कत नाही. एकनाथ शिंदेंना बोलावलं तेव्हा ते म्हणाले राष्ट्रवादीलासे त्रास देतात. आमदारांचा दबाव आहे. भाजपसोबत गेलं पाहिजे. पण भाजपसोबत जायचं असेल तर त्यांच्याकडून प्रस्ताव आला पाहिजे. तो शिवसैनिकांना मान्य पाहिजे. भाजपसोबत गेले तर स्वच्छ आणि आपल्यात राहिलं तर आत टाकणार, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मी तुमच्या साथीने सभा घेणार आहे. शिवसेना मर्दांची सेना आहे. राजकारणात आपण पुढे जात आलेलो आहोत. आत्ताच प्रसंग वेगळाही आहे आणि नाहीहीदेखील. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना मी म्हटलं होतं, दगा देणारे मला नकोयत. विष प्रशन आम्ही करतोय , असं म्हटलं होतं , काँग्रेस राष्ट्रवादी पाठीत खंजीर खुपसतील म्हणत होते, पण आज शरद पवार आणि सोनिया गांधी पाठीशी आहेत , पण जवळचे सोडून गेलेत, असं ते म्हणाले.
तुम्ही कायम सोबत
इथे उपस्थितांची पात्रता असताना त्यांना आपण जागा दिली, निवडून आणलं. पण ते गेले आणि तुम्ही कायम सोबत आहात. दिल्लीत खासदार आहेत, आमदार निवडून आले ते तुमच्यामुळे. मी त्यांना म्हटलं आमदार माझ्याकडे घेऊन या, जर तेव्हाच आमदार घेऊन आले असते आणि माझ्याशी बोलले असते. तिर्थस्थळ करताय, मी ऐकलं कामाख्याला गेले प्रार्थना केली. शिवसेनेविषयी एवढं प्रेम आहे मग गेलात कशाला? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
...तर इथे उपमुख्यमंत्री केलं असतं
जी पदं भोगलीत, जे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं शिवसेनेत हवं सर्व तुम्हाला भाजपमध्ये जाऊन जर तुम्हाला मिळत असेल तर जा. तिकडे जाऊन मुख्यमंत्री होत असाल तर बिनधास्त जा. तिथे जाऊन उपमुख्यमंत्री व्हायचं असेल तर मला आधीच सांगायचं मी केलं असतं इथे. मी या सगळ्यामागे आहे सांगतात, मी एवढा षंढ नाही, मी मागून वार करणारा नाही. मी कशाला हे सर्व करेन. उद्धव ठाकरे एकटे राहिले पाहिजेत असा भाजपचा डाव आहे. करा मला एकटं, तुम्ही निवडून आलेल्याना घेऊन जाऊ शकता, फोडू शकता पण ज्यांनी निवडून दिलं त्या शिवसैनिकांना फोडू शकत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.