CM Uddhav Thackeray: "घाईघाईने निर्बंध शिथील करून धोका पत्करू नका, ७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 04:44 PM2021-06-24T16:44:35+5:302021-06-24T16:45:02+5:30

"कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. आपण त्यातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. त्यामुळे आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करून मगच निर्णय घ्या"

CM Uddhav Thackeray Dont take risks by easing restrictions 7 districts should be more careful | CM Uddhav Thackeray: "घाईघाईने निर्बंध शिथील करून धोका पत्करू नका, ७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी"

CM Uddhav Thackeray: "घाईघाईने निर्बंध शिथील करून धोका पत्करू नका, ७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी"

googlenewsNext

कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. आपण त्यातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. त्यामुळे आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करून मगच निर्णय घ्या, घाईघाईने व्यवहार खुले करू नका, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या सात जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. 

दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरुन तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. डेल्टा प्लस या विषाणूचा देखील धोका वाढतो आहे. हे सगळं लक्षात घेऊन संसर्गाचे वाढते प्रमाण पाहून पुढील किती काळ जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करुन द्यावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या. 

घाईघाईनं व्यवहार खुले करू नका
दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने  प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की , विशेषतः: दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज
कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांना अधिक काळजी घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 

राज्यातील या ७ जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील ३ जिल्हे कोकण, ३ पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल तसेच या जिल्ह्याना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील असे सांगितले. आर चाचणी वाढविणे, वाड्यावस्त्यांमध्ये कंटेनमेंट उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविणे याकडे सर्वानीच लक्ष द्यावे, असे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले. 

यावेळी बोलताना टास्क फोर्सचे डॉ संजय ओक आणि डॉ शशांक जोशी यांनी सांगितले कि, या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत

याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली तसेच गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

प्रारंभी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी या सातही जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे मात्र या सातही जिल्ह्यांचा दर  त्यापेक्षा  दुप्पट-तिप्पट आहे असे सांगितले. रत्नागिरीत पहिल्या लाटेत ३०७४ रुग्ण तर दुसऱ्या लाटेत ५६०० रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत १३४६ तर सध्या ५५०० , हिंगोलीत पहिल्या लाटेत ६६० तर दुसऱ्या लाटेत ६७५ रुग्ण आढळले असून ही  वाढ सावध करणारी आहे असे ते म्हणाले.

Web Title: CM Uddhav Thackeray Dont take risks by easing restrictions 7 districts should be more careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.