मुख्यमंत्री ठाकरेंचा आणखी एक धक्का; फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 03:29 AM2020-02-26T03:29:09+5:302020-02-26T06:54:46+5:30
अपूर्ण कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार
मुंबई : जलयुक्त शिवार अभियानाला अखेर पूर्णविराम लागला आहे. या अभियानांतर्गत अपूर्ण असलेली कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येतील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१८-१९ हे शेवटचे वर्ष होते. मागील सरकारने या अभियानाला ३१ डिसेंबर १९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गडाख यांनी स्पष्ट केले. राज्यातील जलयुक्त शिवार योजनेस मुदतवाढ न देता ती बंद करण्यात आली का, असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांच्यासह भाजप सदस्यांनी उपस्थित केला होता. यावर जलयुक्त शिवार योजनेला राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ही योजना बंद केल्याचे म्हणता येणार नाही.
शिवाय, जलयुक्त शिवार योजनेचे नाव बदलून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे करण्याचे कोणतेच निर्देश सरकारने दिले नसल्याचे गडाख यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून २०१५ ते २०१९ या काळात २२ हजार ५८६ गावे निवडण्यात आली होती. या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत एकूण ६ लाख ३२ हजार ७०८ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ९ हजार ७०७ कोटींचा निधी खर्च झाल्याचे जलसंधारण मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्टपणे नमूद केले.
योजना नव्हे, हे तर अभियान
जलयुक्त शिवार ही योजना नसून एक अभियान आहे. अभियानाची मुदत संपल्यानंतरही जी कामे अपूर्ण असतील ती कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण केली जातील. मात्र नव्याने कोणतेही काम हाती घेतले जाणार नाही, असे गडाख यांनी यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.