असंख्य शिवसैनिक, मुख्यमंत्र्यांवर पुष्पवर्षाव; उद्धव ठाकरे 'वर्षा'वरून 'मातोश्री'कडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 10:13 PM2022-06-22T22:13:28+5:302022-06-22T22:13:52+5:30
उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून बाहेर पडताना त्या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री साडेनऊच्या आसपास ते वर्षावरून मातोश्रीसाठी रवाना झाले.
राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये थांबले आहेत. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुख्यमंत्री आपल्या वर्षा या निवासस्थानाहून मातोश्रीकडे गेले.
यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी वर्षा बंगल्यासमोर गर्दी केली होती. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. तसंच मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेदेखील होते. कार्यकर्त्यांमधून वाट करत ते मातोश्रीच्या दिशेने निधून गेले.
#WATCH Maharashtra CM Uddhav Thackeray along with his family leaves from his official residence, amid chants of "Uddhav tum aage badho, hum tumhare saath hain" from his supporters.#Mumbaipic.twitter.com/m3KBziToV6
— ANI (@ANI) June 22, 2022
काय म्हणाले मुख्यमंत्री?
काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होता. पण माझ्या लोकांनाच मी नको. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे माझ्याशी चर्चा करायला हवी होती. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो. उगाच का असं करताय? मी राजीनामा तयार करून ठेवला. या आणि राजभवनात पत्र घेऊन जा, सत्तेसाठी मी लाचार नाही असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले.