शिवसेनेचं ठरलं; उद्धव ठाकरे आमदारकीसाठी निवडणार 'वरचा मार्ग'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:43 AM2020-01-06T11:43:00+5:302020-01-06T11:44:49+5:30
उद्धव ठाकरेंना सहा महिन्यांत विधिमंडळात निवडून यावं लागणार आहे.
मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे ठरले. मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकणारे आदित्य महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीदेखील झाले. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक न लढवता विधानपरिषदेचे सदस्य होण्याची शक्यता आहे. 'मुंबई मिरर'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
एप्रिलमध्ये विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त होणार आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे निवडणूक लढवतील, अशी माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं दिल्याचं 'मुंबई मिरर'नं म्हटलं आहे. 'विधान परिषदेचे सदस्य विधानसभेच्या आमदारांमधून निवडले जातात. विधानसभेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून येतील', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सहा महिन्यांचा कालावधी असल्याचंदेखील या नेत्यानं सांगितलं.
धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे विधानपरिषदेची जागा रिक्त झाली. त्यामुळे याच जागेवरुन उद्धव ठाकरे विधानपरिषदेची निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. मुंडेंचा विधानपरिषदेतील कार्यकाळ जुलै २०२२ मध्ये संपणार होता. त्यामुळे उद्धव यांनी ती जागा लढवल्यास त्यांचा कार्यकाळ पुढील अडीच वर्षात संपेल. तसं झाल्यास त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवाली लागेल. त्यामुळेच एप्रिलमध्ये विधानपरिषद लढवून ६ वर्ष विधानपरिषदेवर राहण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे. महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे एप्रिलमध्ये विधानपरिषद लढवतील आणि २०२६ पर्यंत विधानपरिषदेचे सदस्य राहतील, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं दिली.
उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नसल्याचंदेखील या पदाधिकाऱ्यानं सांगितलं. 'माहीम किंवा शिवडी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी असा आग्रह होता. मात्र त्यासाठी विद्यमान आमदाराला राजीनामा द्यावा लागेल. याशिवाय संपूर्ण पक्षाला त्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं लागेल. त्यापेक्षा विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे,' असं या नेत्यानं म्हटलं.