Raj Thackeray: ब्रेकिंग! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवली; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:15 PM2022-05-13T17:15:27+5:302022-05-13T17:17:29+5:30
राज ठाकरेंना मिळालेल्या धमकीनंतर ठाकरे सरकारने अखेर त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लागोपाठ घेतलेल्या सभा, मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेली ठाम भूमिका, हनुमान चालिसा लावण्याचे केलेले आवाहन आणि जाहीर केलेला अयोध्या दौरा या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांना धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली होती. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेटही घेतली होती. यानंतर आता राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतला आहे.
राज ठाकरे यांना मिळालेल्या धमकीवरूनही शिवसेनेने मनसेला टोला लगावला होता. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. अशा धमकीची शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे स्टंटबाजी सोडा आणि लोकांच्या प्रश्नांवर बोला, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला होता. यानंतर मनसेने शिवसेनेवर पलटवार केला होता. मात्र, यानंतर आता ठाकरे सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता कशी असेल राज ठाकरे यांची सुरक्षा?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आधीच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून, फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर अखेर राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या कार्यालयात एक धमकीचे पत्र आले होते. यामध्ये बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन संबंधित पत्र त्यांच्या सुपूर्द केले होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना संबंधित विषयाची सविस्तर माहिती दिली. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन तुम्ही सुरू केलेले आंदोलन थांबवा नाहीतर तुम्हाला जीवानिशी मारले जाईल आणि तुमच्या राज ठाकरेंनाही सोडणार नाही, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली होती. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत असे त्यांनी सांगितले होते.