मंत्रालयातल्या 'त्या' बैठकीनंतर तुकाराम मुंढेंची बदली; ठाकरे सरकारची रणनीती ठरली?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 09:39 PM2020-01-21T21:39:31+5:302020-01-21T21:42:25+5:30

तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी

cm uddhav thackeray meets tukaram mundhe in mantralaya before giving him charge of commissioner post of nagpur municipal corporation | मंत्रालयातल्या 'त्या' बैठकीनंतर तुकाराम मुंढेंची बदली; ठाकरे सरकारची रणनीती ठरली?

मंत्रालयातल्या 'त्या' बैठकीनंतर तुकाराम मुंढेंची बदली; ठाकरे सरकारची रणनीती ठरली?

Next

नागपूर: सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची ठाकरे सरकारकडून बदली करण्यात आली आहे. सध्या एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक पदावर कार्यरत असणाऱ्या मुंढेंची आता नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच मुंढेंची आयुक्तपदी वर्णी लावण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

आज सकाळी मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुकाराम मुंढेंची भेट झाली होती. या भेटीत दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. याच भेटीनंतर मुंढेंची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. नागपूर महापालिकेतील राजकीय परिस्थिती पाहता मुंढेंची नियुक्ती अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. महापालिकेत दणदणीत बहुमत असलेल्या भाजपाला शह देण्यासाठी मुंढेंना आयुक्तपद देण्यात आल्याचं बोललं जात आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपानं तब्बल १०८ जागा जिंकल्या आहेत. नागपूर महापालिकेत एकूण १५१ सदस्या आहेत. 

दोन वर्षात नागपूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंढेंकडे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे अधिकारी अशी मुंढेंची ओळख आहे. मुंढे जिथे जातात, तिथे त्यांच्यात आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद होतो, हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. मुंढे यांच्या कामकाजाची पद्धत सत्ताधाऱ्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेचं आयुक्तपद देण्यात आल्याची चर्चा आहे. 

याआधी डिसेंबर २०१८ मध्ये तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी मुंढे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. पुणे पालिका परिवहन सेवेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी असतानादेखील मुंढेंनी धडाकेबाज कामगिरी केली होती. परिवहन सेवेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. अतिशय कर्तव्यकठोरपणे काम करत असल्यानं त्यांच्याविरोधात तक्रारीदेखील करण्यात आल्या. 

पुणे पालिका परिवहन सेवेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन मुंढेंची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. तिथेही त्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली. त्यामुळे सत्ताधारी आणि मुंढेंमध्ये संघर्ष टोकाला पोहोचला होता. तेथून २२ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंढेंची मुंबईत राज्याच्या नियोजन विभागाच्या सहसचिवपदी करण्यात आली होती. मात्र महिना उलटण्यापूर्वीच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली होती. 
 

Web Title: cm uddhav thackeray meets tukaram mundhe in mantralaya before giving him charge of commissioner post of nagpur municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.