एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा अन् एक काँग्रेसचा; मुख्यमंत्र्यांकडून तीन मंत्र्यांचं तोंडभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:25 AM2022-03-25T08:25:25+5:302022-03-25T08:26:05+5:30
महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ बोलणारे नाही, तर जे बोलतो ते करून दाखविणारे सरकार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ बोलणारे नाही, तर जे बोलतो ते करून दाखविणारे सरकार आहे. मुंबईकरांच्या हिताच्या गोष्टी करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विरोधकांना सुनावले.
मुंबईतील गृहनिर्माणाबाबत नियम २९३ नुसार विधानसभेत झालेल्या चर्चेला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. या तिघांचेही अभिनंदन करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघितले जाते. जो तो अंडी नेतो; पण ही कोंबडीची निगा राखणार कोण, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मुंबईकर, गिरणी कामगार, कष्टकरी जनता यांनी घाम गाळला, रक्त सांडले. त्यातून ही मुंबई मिळाली; पण त्यांचा विचार आजपर्यंत कोणीच केला नव्हता. तो विचार कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षात आणणारे हे सरकार आहे.
म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांसाठी असलेल्या अडचणी दूर करून देशात उत्तम उदाहरण निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत. रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अभय योजना जाहीर करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आजोबा झाड लावतात, नातवंडांना फळे मिळतात
झोपडपट्टी पुनर्विकासातून मुंबईकरांना हक्काचे घर देण्याचा विचार सर्वांत पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. युती सरकारमध्ये तो विचार प्रत्यक्षात आला. मात्र, त्यानंतर मधल्या काळात त्याला संथगती आली. आजोबा नारळाचे झाड लावतात आणि त्याची फळे नातवंडांना मिळतात असे म्हणतात; पण त्याहीपेक्षा वेळ होऊ लागला. फळे लागताहेत, पण मलई कोण खातोय, हा संशोधनाचा विषय आहे. अनेक वर्षे ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक राहताहेत, त्यांना घरे मिळवून देण्यासाठी या सरकारने योजना आणल्या आहेत. या सर्व योजनांबद्दल तिन्ही मंत्र्यांचे अभिनंदन करतो, असे ठाकरे म्हणाले.