राज्यातील शेतकरीच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 05:12 PM2020-02-15T17:12:13+5:302020-02-15T17:16:17+5:30

जळगाव येथे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

CM Uddhav Thackeray said that the farmers of the state are the focal point of Maharashtra | राज्यातील शेतकरीच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू- उद्धव ठाकरे

राज्यातील शेतकरीच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू- उद्धव ठाकरे

googlenewsNext

जळगाव: राज्यातील शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडविण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही प्रथमोपचार असून शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि त्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

जैन इरिगेशन लि. तर्फे देण्यात येणारा पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च- तंत्र पुरस्कार वितरण सोहळा आज दुपारी जैन हिल्स येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. नंदापूर, ता. जि. जालना येथील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कामगार कल्याण मंत्री दिलीप वळसे- पाटील, कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, खासदार उन्मेश पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजय सावकारे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, अनिल पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कवी पद्मश्री ना. धो. महानोर, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, प्रतिभाताई पवार,  चंद्रकला दत्तात्रय चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, भारताला बलशाली करण्यासाठी ‘शेती आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे’ हा पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी सांगितलेला विचार कृतीत आणण्यात येईल. शेती क्षेत्रात बदल घडून येत आहेत. या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. हे बदल कौतुकास्पद आहेत. शेतकऱ्यांनी निश्चय करून बदल स्वीकारले पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रगती करीत बदलाचे वारे देशभर पोहोचवावेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पवार म्हणाले, अप्पासाहेब पवार यांनी शेती, पाणी, माती यांचा अभ्यास करीत उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित केले. आता शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरुन कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न शेतकरी घेवू शकतील. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा हा परिसर आहे, असेही त्यांनी सांगितले.  

गुलाबराव पाटील म्हणाले की, देशातील केळीच्या क्षेत्रापैकी 20 टक्के क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे. 49 हजार हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड केली जाते. त्यामुळे तेलबिया संशोधन मंडळाच्या जागेत केळी संशोधन केंद्र कार्यान्वित करावे. प्रलंबित वीज जोडण्यांसाठी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

पुरस्कारप्राप्त शेतकरी चव्हाण यांनी सांगितले, उच्च तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. पाणलोट क्षेत्र विकास केला. त्यामुळे फळबागांची लागवड करणे शक्य झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.   
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रास्ताविक केले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आभार मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: CM Uddhav Thackeray said that the farmers of the state are the focal point of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.