BJP vs Shivsena: "कितीही आव आणा, 'सामना'तून भाजपाच्या नावाने खडे फोडणारे अग्रलेख लिहा पण..."; मुख्यमंत्री अन् शिवसेनेवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 10:15 AM2022-01-20T10:15:10+5:302022-01-20T10:15:52+5:30
नगर पंचायतीच्या निकालानंतर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
मुंबई : महाराष्ट्रातील ९७ नगर पंचायतींचे निकाल बुधवारी जाहीर झाले. निकालाअंती राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर वर्चस्व मिळविले. विशेष बाब म्हणजे भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या. काँग्रेसला याचा बराच फटका बसला. त्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण राज्याचे मुख्यमंत्रिपद असलेली शिवसेनेला मात्र निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे शिवसेना चौथ्या स्थानी राहिली. या निकालांवर भाष्य करताना भाजप प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर खोचक शब्दात टीका केली.
निवडणुकीचे निकाल हाती येण्याआधी त्यांनी एक ट्वीट केले होते. 'गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विधानसभा, परिषदेपासून ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, त्यात एकच गोष्ट होती ती म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचा असून शिवसेना चार नंबर वर आणि भाजपा नंबर १ चा पक्ष. आज नगरपालिका निवडणूक निकाल हाच ट्रेन्ड कायम राहिल', असे ते ट्वीट होते. त्यानंतर संपूर्ण निकाल लागल्यानंतर त्यांनी पुन्हा एक ट्वीट करत शिवसेनेला चिमटा काढला. 'काल सकाळी हे ट्वीट केल होतं आणि सायंकाळी तेच खरं ठरलं. कथित वचनासाठी (की मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी) मतदारांशी विश्वासघात करत पद मिळवले. पण जनता ते स्वीकारायला तयार नाही. कितीही आव आणा, सामनातून भाजपाच्या नावाने खडे फोडणारे अग्रलेख लिहा, पण जमिनीवरचं वास्तव बदलणार नाही", अशी खोचक टीका उपाध्ये यांनी केली.
काल सकाळी हे ट्वीट केल होत व सांयकाळी तेच खर ठरलं. कथित वचनासाठी(की मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी) मतदारांशी विश्वासघात करत पद मिळवले पण जनता ते स्वीकारायला तयार नाही. कितीही आव आणा सामनातून भाजपाचा नावाने खडे फोडणारे अग्रलेख लिहा पण जमिनीवरच वास्तव बदलणार नाही https://t.co/LGpXizp7Kd
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 20, 2022
काय लागला निकाल?
महाराष्ट्रातील ९७ नगर पंचायतींचे निकाल लागले. त्यात सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक वर्चस्व मिळविले. भाजपने दुसऱ्या क्रमांकावर राहत २२ नगरपंचायती जिंकल्या. काँग्रेसला या निवडणुकांमध्ये थोड्या प्रमाणात कमी यश मिळाले. त्यांनी २१ तर शिवसेनेने १७ नगर पंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले. जागांच्या बाबतीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला. भाजपने सर्वाधिक ३८४ जागा, राष्ट्रवादीने ३४४ जागा, काँग्रेसने ३१६ तर शिवसेनेने २८४ जागा जिंकल्या.