Chipi Airport : कोकणचा कॅलिफोर्निया करु म्हणणारे अनेकजण आले आणि गेले; मुख्यमंत्र्यांचा राणेंवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 03:32 PM2021-10-09T15:32:25+5:302021-10-09T15:32:44+5:30
नारायण राणे यांच्या टोलेबाजीनंतर मुख्यमंत्र्यांनीही लगावले टोले.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाचे उद्घाटन झाल्याचं जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टोले हाणले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मंचावरून यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं.
कोकणचा कॅलिफोर्निया करु म्हणणारे अनेकजण आले आणि गेले. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी सांगितलं होतं, कॅलिफोर्नियालाही अभिमान वाटेल, असं कोकण आपण करु, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राणेंना टोला लगावला. पाठांतर करून बोलणे वेगळे आणि आत्मसात करून तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे आणखी वेगळे असते. ज्योतिरादित्य शिंदे केंद्रीय मंत्री असूनही त्यांची राज्यातील विमानतळांसंदर्भातील तळमळ दिसून आली. त्यांनी स्वतःहून बैठका घेतल्या. आपुलकीने विचापूर केली, असे नमूद करत ज्योतिरादित्य शिंदे मराठी मातीचा संस्कार विसरले नाहीत, याबाबत तुमचे अभिनंदन, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना काढले.
काय म्हणाले होते राणे?
"हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच क्षण आहे. या वेळी कुठलेही राजकारण करू नये, असे मला वाटत होते आणि आकाशात उडणारे विमान डोळे भरून पाहावे, असे वाटत होते. म्हणून स्तुत्य हेतूने मी या कार्यक्रमासाठी आलो आहे. मंचावर येताना मुख्यमंत्रीही मला भेटले. ते माझ्या कानातही काही बोलले. पण मी ते ऐकले नाही. असो, परदेशातून पर्यटक येथे यावेत, येथील लोकांना रोजगार मिळावा. येथील लोक समृद्ध व्हावेत यासाठी या विमानतळासाठी प्रयत्न केले," असं राणे यावेळी म्हणाले.
मी १९९० साली जिल्ह्यात आलो, तेव्हा जिल्ह्यात, पाण्याचा प्रश्न होता, रस्त्ये व्यवस्थित नव्हते, शाळा व्यवस्थित नव्हत्या, विजेचा प्रश्न होता. लोक आंधारात राहायचे. सिंद्धुदुर्ग मुंबईवर अवलंबून होता. यानंतर, या भागाचा विकास मी केला, असं त्यांनी नमूद केलं.