घरुन काम करत होतो म्हणून...; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी सांगितला 'फायदा'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 03:45 AM2020-12-13T03:45:37+5:302020-12-13T06:52:32+5:30
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. १७४ कोटींचे सफारी पार्क, १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे, २५ कोटी रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजनसुद्धा रिमोट दाबून करण्यात आले.
औरंगाबाद : “होय, मी घरी बसून काम करीत होतो. मीच नागरिकांना घरी राहा, सुरक्षित राहा, असा सल्ला दिला होता. घरी बसून काम केल्यामुळे आज हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे शनिवारी विरोधकांना लगावला.
गरवारे क्रीडा संकुलावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री सुभाष देसाई, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. १७४ कोटींचे सफारी पार्क, १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे, २५ कोटी रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजनसुद्धा रिमोट दाबून करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शहराशी अतूट नाते होते. हे नाते अधिक मजबूत करण्यासाठी मी आलोय.
श्रीखंड्या होण्यासही तयार
पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे शिष्य श्रीखंड्या यांनी कावडीमधून पाणी आणून हौद भरला होता. औरंगाबादेतील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी मी श्रीखंड्या होण्यासही तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.