इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं; 'पुन्हा येईन'वरुन मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 01:31 PM2019-12-01T13:31:56+5:302019-12-01T13:49:27+5:30

फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

cm uddhav thackeray taunts opposition leader devendra fadnavis in maharashtra assembly | इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं; 'पुन्हा येईन'वरुन मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं; 'पुन्हा येईन'वरुन मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

Next

मुंबई: मी इथं येईन असं कधीच म्हटलं नव्हतं. पण आयुष्य म्हणजे रंगभूमी आहे. इथं कधी कोणाला कोणती भूमिका करावी लागेल सांगता येत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'मी पुन्हा येईन' वरुन चिमटा काढला. यापुढे विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नाही, असं मी म्हणेन. कारण विरोधकदेखील माझे मित्र आहेत. माझी आणि त्यांची मैत्री फार जुनी आहे. ती यापुढेही कायम राहील, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांची आज विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा झाली. यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजीदेखील केली. 'मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मी असा पहिलाच मुख्यमंत्री आहे, ज्याच्या समोरचा विरोधी पक्ष त्याचा ३० वर्ष जुना मित्र आहे आणि सोबत असलेले सहकारी आतापर्यंतचे राजकीय विरोधक आहेत. विरोधी पक्षात बसलेल्यांना मी विरोधक समजत नाही. कारण ते माझे मित्रच आहेत. तुमच्यासोबतची मैत्री मी कधीही लपवली नाही आणि यापुढेही लपवणार नाही,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

काल मी देवेंद्र फडणवीसांच्या कानात काय बोललो, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र बंद दाराआड आणि कानात काय बोललो ते सांगण्याची आमची संस्कृती नाही, असं म्हणत उद्धव यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहांना टोला लगावला. विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारला सहकार्य कराल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. तुम्ही सोबत असता तर आज मी हा कारभार घरी बसून टीव्हीवर पाहिला असता. मला इथं यावं लागलं नसतं. कारण इथे येईन असं मी कधीच म्हटलं नव्हतं, असा चिमटा उद्धव यांनी काढला. 

Web Title: cm uddhav thackeray taunts opposition leader devendra fadnavis in maharashtra assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.