...तर आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितला पुढचा धोका
By कुणाल गवाणकर | Published: November 22, 2020 08:33 PM2020-11-22T20:33:35+5:302020-11-22T20:38:18+5:30
CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांचा राज्यातील जनतेशी संवाद; सहकार्य कायम ठेवण्याचं आवाहन
मुंबई: कोरोनापासून राज्यातील जनतेचा बचाव वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यापुढेही सरकार आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करेल. पण नागरिकांना काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. गर्दी टाळावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांनी आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. अनेक जण मास्क न घालताच सध्या वावरत आहेत. कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे अशी ढिलाई परवडणारी नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले.
गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. 'गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. मात्र आपण ते अतिशय साधेपणानं साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याला तोड नाही. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचं सहकार्य मिळेल,' अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
We have opened all religious places in the state but my appeal to the public is not to crowd them: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/rS2KbL5zhG
— ANI (@ANI) November 22, 2020
जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या लाटेचा धोका सांगितला. 'दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक पाश्चिमात्य देशांत तर लाट नव्हे, त्सुनामीच आली आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे,' असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपल्यासाठी राबत आहेत. त्यांच्यावर आणखी किती ताण आणायचा हा प्रश्न आहे आणि हे आपल्या हाती आहे. अनेक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनाची लाट आली आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी पडली तर मग आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.
दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
गेल्या महिन्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात घसरण सुरू होती. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्या होणाऱ्यांच्या तुलनेत कमी होती. मात्र दिवाळीत बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या यापेक्षा कमी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १८ लाखांच्या जवळ
राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ७५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १७ लाख ८० हजार २०८ वर पोहोचला. गेल्या २४ तासांत ५० जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १६ लाख ५१ हजार ६४ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्याच्या घडीला ८१ हजार ५१२ जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ४६ हजार ६२३ जणांचा मृत्यू झाला आहे.