CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: व्हिलन, खलनायक ठरवलं तरी चालेल, राज्यातील जनतेची काळजी घेणार - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:45 PM2021-03-03T16:45:21+5:302021-03-03T16:54:02+5:30
CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: कोरोनाच्या संकटाशी खेळ करु नका, असे सत्ताधारी आणि विरोधकांना आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session day 3 live updates) सुरु आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधकांच्या सर्व टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी सडेतोड उत्तर दिले. तसेच, कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर भाष्य करताना राजकारणापेक्षा राज्यातील जनतेचा जीव प्यारा आहे. राज्यातील जनतेची काळजी घेणार, यासाठी मला कोणी व्हिलन, खलनायक ठरवले तरी चालेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय, कोरोनाच्या संकटाशी खेळ करु नका, असे सत्ताधारी आणि विरोधकांना आवाहन त्यांनी केले. (Maharashtra Budget Session : CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha)
माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार योजनेची थट्टा केली जात आहे. कोविन अॅपमध्ये अडथळे निर्माण झाले, पण केंद्र सरकारवर टीका करणार नाही. राज्यात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याचबरोबर,कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन प्रभावी हत्यार आहे. परदेशात अजूनही लॉकडाऊन केले जात आहे. मात्र, गोरगरिबांची चूल पेटली पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चूल असा शब्द वापरत विरोधकांना पेट्रोलच्या सेंच्युरी आणि गॅसच्या हजारीवरुन टोला हाणला.
कोरोना काळातील पीएम-केअर निधीवरुन उद्धव ठाकरेंनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या, तर ज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये मदत केली, त्यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. तसेच, राज्यातील जनतेची काळजी घेणार, यासाठी मला कोणी व्हिलन, खलनायक ठरवले तरी चालेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय, कोरोनाच्या संकटाशी खेळ करु नका, असे सत्ताधारी आणि विरोधकांना आवाहन त्यांनी केले.
याचबरोबर, मी कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करतो होतो. या फेसबुक लाईव्हरील फीडबॅकमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच फेसबुक लाईव्हमुळे महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागली, हीच माझी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. फेसबुक लाईव्हमधून मी महाराष्ट्राच्या जनतेच्या घरात पोहोचलो, नागरिकांना धीर मिळाला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
याशिवाय, कोरोना काळातील घोटाळा आणि आरोपांवरील टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. हा व्हायरस आहे, तो व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सभागृहातच टोला लगावला.