मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षीनिरीक्षक होतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 08:59 PM2021-01-08T20:59:49+5:302021-01-08T21:05:16+5:30

पक्षीनिरीक्षणातून मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचा परिचय

CM Uddhav Thackeray watches birds at pavani project in bhandara | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षीनिरीक्षक होतात तेव्हा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षीनिरीक्षक होतात तेव्हा...

Next

भंडारा: आपल्यातील संवेदनशील पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत व्यस्त आणि धकाधकीच्या अशा दौऱ्यातही निसर्गातील घटकांची माहिती घेतली तसेच त्यांच्या संवर्धनाविषयी जाणीवेने उपाययोजना करण्याची ग्वाहीही दिली. निमित्त होते भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याचे.

पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पवनी तालुक्यातील प्रकल्पस्थळाला भेट दिली. या भेटीतील नियमित उपक्रमांसोबतच एक अनोखा उपक्रम होता तो या जलाशयातील पक्षीसंपदेची माहिती करून घेण्याचा. वन परिक्षेत्र अधिकारी आणि पक्षी निरीक्षक पांडुरंग पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना जलाशय परिसरातील पक्षांच्या विविध प्रजातींची माहिती दिली. येथे येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची माहिती जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांनी विलक्षण आस्था दर्शवली. जलाशयात विहार करीत असलेल्या पक्ष्यांच्या सवयी, अधिवास, वैशिष्ट्ये आदींबाबतही त्यांनी विविध बाबी अतिशय औत्सुक्याने जाणून घेतल्या.

या प्रकल्पात निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे विविध स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या प्रमाणात येतात. मुख्यमंत्र्यांनी येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा भ्रमण मार्ग आणि त्यांचे मुळचे अधिवासी देश यासंदर्भात माहिती घेतली. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये सायबेरिया, चीन, दक्षिण आफ्रिका यासह लडाख, हिमाचल आधी भागातूनही मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. त्यासोबतच स्थानिक पक्षांबद्दल उत्सुकतेने माहिती घेतली. येथील जलाशयात पाणकावळे, बगळे, खंड्या, ढोकरी, तुयीया अशा अनेक प्रजाती कायम वास्तव्याला असतात. त्यांच्या आवडीचे मासे मोठ्या प्रमाणात येथे उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज या परिसरातील 50 पेक्षा जास्त पक्षांचे निरीक्षण केले.

काही पक्षी दक्षिणेकडे जाताना त्यांचा काही काळ मुक्काम या परिसरात राहतो तर काही पक्षी अधिक काळही येथे वास्तव्याला राहतात. अमोर फालकन या पक्षाबद्दल त्यांनी अधिक माहिती घेतली. हा पक्षी सध्या लोणावळ्यात वास्तव्याला आहे. तो मंगोलियातून राज्याच्या विविध भागात येतो. या पक्षाला हिमालयासारख्या उंच पर्वतावरून उडता येत नसल्यामुळे तो  नागालँड येथून भारतात प्रवेश करतो. भारतातील वास्तव्यानंतर ते आफ्रिकेत परत जातात. या पक्षाबद्दल पक्षीप्रेमींना विशेष आकर्षण आहे स्थलांतरित पक्षी ज्या भागात येतात आणि ज्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे ती जागा संरक्षित करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली. पक्षीनिरीक्षण हा पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असल्यामुळे स्थलांतरित व स्थानिक पक्षांचे जेथे वास्तव्य आहे त्यांचे वास्तव्य अधिक सुरक्षित करण्यात यावे. त्यामुळे स्थानिक पर्यटनाला अधिक चालना मिळेल असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूरच्या गोरेवाडा परिसरात पक्ष्यांच्या 225 पेक्षा अधिक प्रजाती आहेत स्थलांतरित पक्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती यावेळी त्यांनी घेतली. समृद्ध अशा पर्यटनस्थळांना संरक्षित करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी या भेटीमध्ये विशेष रुची दाखवली. गोरेवाडा प्राणीसंग्रहालय परिसरातील पक्षीनिरीक्षणासाठी पाखले यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी निमंत्रित केले.

या पाहणीनंतर झालेल्या बैठकीत त्यांनी पर्यटन विकासासाठी होऊ शकणाऱ्या प्रयत्नांबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. श्री. ठाकरे निसर्गप्रेमी असून त्यांना वन्यजीवांविषयी विशेष आस्था असल्याचे साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र आज या दौऱ्याच्या निमित्ताने  या साऱ्यांतून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे राजकारणापलीकडची तरल संवेदनशिलता दर्शविणारे एक मनोहारी व्यक्तिमत्व उलगडले.

Web Title: CM Uddhav Thackeray watches birds at pavani project in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.