अखेर ठरलं! मुख्यमंत्री ठाकरे फिल्डवर उतरणार; राज्याचा दौरा करणार, अनेक सभा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 02:38 PM2022-05-14T14:38:59+5:302022-05-14T14:39:56+5:30
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज्यव्यापी दौरा करणार
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. त्यांना जनतेच्या व्यथा, वेदना कशा समजणार?, असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार उपस्थित केले जातात. मंत्रालयात न जाणारे, घरात बसून राहणारे मुख्यमंत्री, अशी खोचक टीका ठाकरेंवर वारंवार केली जाते. याच टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दरम्यान ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. त्यांच्या समस्या जाणून घेतील. सोबतच शिवसैनिकांसोबत संवाद साधतील.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत राज्यासह देशात लॉकडाऊन लागला. या कालावधीत मुख्यमंत्री बऱ्याचशा बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहिले. ते मंत्रालयातही फारसे फिरकले नाहीत. मंत्रिमंडळाच्या बहुतांश बैठकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका विरोधकांनी केली. त्याच टीकेला मुख्यमंत्री ठाकरे राज्यव्यापी दौऱ्यातून उत्तर देणार आहेत.
आज मुंबईत शिवसेनेची सभा आहे. या सभेतून मुख्यमंत्री ठाकरे भाजप आणि मनसेचा समाचार घेण्याची सभा आहे. भाजप आणि मनसेकडून सातत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा समाचार मुख्यमंत्री ठाकरे आजच्या सभेतून घेऊ शकतात. आजच्या सभेनंतर मुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. त्याची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे राज्यभरात फिरतील. लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. आजच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली. आमदारांच्या बैठकादेखील सुरू आहे. जूनमध्ये शिवसेनेचा स्थापना दिन आहे. त्यावेळी संभाजीनगरात (औरंगाबाद) महामेळाव्याचं आयोजन करण्यात येईल, असं राऊत यांनी सांगितलं.