‘मी फेस टू फेस’ भेटणारा मुख्यमंत्री, सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 05:37 AM2024-03-11T05:37:15+5:302024-03-11T05:39:22+5:30
उद्या कोणीही सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला तर आनंद होईल. ही काही कुणाची जहागिरी नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली : घरातून काम करणारा, उंटावरून शेळ्या हाकणारा मी नाही. आपत्तीत थेट जनतेच्या दारी पोहोचणारा आहे. फेसबुक लाइव्ह करणारा नव्हे, तर जनतेची फेस टू फेस भेट घेणारा मुख्यमंत्री असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
हिंगोली येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. राज्यात २२ कार्यक्रमांतून ५ कोटी ६५ लोकांना थेट लाभ दिला. कामांचा एवढा धडाका आहे की, त्यासमोर महाविकास आघाडीच्या लवंगी फटाक्याचा आवाजच येत नाही. पूर्वी लोकांची कामे होत नसत; त्यामुळे ते लाभाचा नादच सोडून द्यायचे. हे चित्र आता बदलले.
सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’
मी स्वत:ला सीएम म्हणजे मुख्यमंत्री नव्हे, तर ‘कॉमन मॅन’ समजतो. उद्या कोणीही सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला तर आनंद होईल. ही काही कुणाची जहागिरी नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.