पक्षांतर्गत विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 05:19 AM2019-08-28T05:19:36+5:302019-08-28T05:20:04+5:30

प्रकाश आंबेडकरांचा आरोप : विरोधकांच्या मागे चौकशांचा ससेमिरा

CM's pressure on opponents within the party | पक्षांतर्गत विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांचा दबाव

पक्षांतर्गत विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांचा दबाव

Next

मुंबई : विविध चौकश्यांचा ससेमिरा लावून विरोधीपक्षातील नेत्यांना संपविण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राबवित आहेतच, शिवाय पक्षांतर्गत विरोधकही त्यांच्या निशाण्यावर आहेत. चंद्रकांत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी मंडळी आता गप्प आहे, कारण सर्वांनाच ब्लॅकमेलिंगची भीती आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.


राज्य सहकारी बँकप्रकरणी अजित पवार यांच्यासह अन्य विरोधकांच्या चौकशीची जी वेळ साधली आहे; त्यात राजकारणाचा वास येतो आहे. एक-एक करून विरोधकांना संपविण्याचे सरकारचे धोरण आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भातील अहवाल का प्रकाशित केला जात नाही, असा सवालही त्यांनी केला.


पी. चिदम्बरम आदी विरोधी नेत्यांच्या चौकशीचे हे लोण पक्षांतर्गत विरोधकांपर्यंत पोहचणार आहे. चंद्रकांत पाटील हे एक उदाहरण आहेत. उद्धव ठाकरेंना विचारा की ते का बोलत नाहीत? कारण ब्लॅकमेलिंगची भीती सगळ्यांनाच आहे, असेही आंबेडकर म्हणाले. आपल्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. नक्षलवाद्यांशी संबंध जोडण्यात आला पण त्याला पुरून उरल्याचे आंबेडकर म्हणाले.
वंचितची सत्ता आल्यास एससी, एसटीच्या धर्तीवर ओबीसींनाही पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ , क्रिमिलेअरची अट काढण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला जाईल. ओबीसींसाठी स्वतंत्र बजेट करून विद्यार्थ्यांना फ्री-शीप आणि स्कॉलरशीपचा निर्णय घेऊ, असे आश्वासनही आंबेडकर यांनी दिले.



आघाडीसाठी काँग्रेसला अल्टिमेटम
एमआयएमसोबत आमची युती कायम आहे. लवकरच जागा वाटपही होईल. काँग्रेसला आघाडीसाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत आहे. आता आघाडीसाठी जास्त काळ थांबणार नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

Web Title: CM's pressure on opponents within the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.