सहकार चळवळ संकटात
By admin | Published: July 7, 2014 01:10 AM2014-07-07T01:10:09+5:302014-07-07T01:10:09+5:30
सहकारी बँकांनी नेहमीच गरीब व गरजूंची मदत केली. त्यांना कर्ज दिले. अनेकांना आपल्या पायावर उभे केले. छोट्या उद्योगांना चालना दिली. पण आज तीच विदर्भातील सहकार चळवळ संकटात सापडली आहे,
स्व. प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार सोहळा : नितीन गडकरी यांची खंत
नागपूर : सहकारी बँकांनी नेहमीच गरीब व गरजूंची मदत केली. त्यांना कर्ज दिले. अनेकांना आपल्या पायावर उभे केले. छोट्या उद्योगांना चालना दिली. पण आज तीच विदर्भातील सहकार चळवळ संकटात सापडली आहे, याची खंत वाटत असल्याची भावना केंद्रीय रस्ते, परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
मानव मंदिर संस्थेच्यावतीने रविवारी स्व. प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे होते.
अतिथी म्हणून आमदार सुधाकर देशमुख, मानव मंदिर संस्थेचे अध्यक्ष गिरीश गांधी, अॅड़ निशांत गांधी व सत्कारमूर्ती रवींद्र दुरुगकर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून,कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यानंतर नितीन गडकरी यांच्या हस्ते रवींद्र दुरुगकर यांना रोख ११ हजार रूपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. गडकरी पुढे म्हणाले, महाराष्ट्र व गुजरातमधील सहकार क्षेत्रात अनेक चांगली कामे झाली आहेत.
मात्र असे असताना दिल्ली सरकारच्या मनात या क्षेत्राविषयी संभ्रम आहे. रवींद्र दुरुगकर यांनी विदर्भातील सहकार क्षेत्राला बळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता या क्षेत्राला त्यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे.
सध्या सहकार क्षेत्रात काम करणे फार कठीण झाले आहे. भांडवल बँकेचे असते, परिश्रमही बँकच घेते, मात्र त्यावर अधिकार डीडीआर गाजवितो. त्यामुळे सहकार कायद्यात सुधारणा करून तो बदलविणे आवश्यक आहे. शिवाय सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्राने हा प्रयोग सुरू केला असून, त्याचा गुणात्मक परिणाम दिसू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गडकरी नसते तर आपणही भाजपात नसतो
काँग्रेस पक्ष सोडून नुकताच भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार दत्ता मेघे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करताच, कदाचित गडकरी नसते तर आपणही भाजपात गेलो नसतो, असे सांगितले. शिवाय आपण अलीकडे कमी बोलून समाजातील चांगल्या लोकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. नितीन गडकरी यांचा विश्वास व त्यांची काम करण्याची पद्घत याचा अभिमान वाटतो. गत काही दिवसांपासून मी काँग्रेस सोडणार, भाजपात जाणार, अशी मुद्दाम चर्चा केली जात होती. त्यामुळे कुणी धक्का देण्यापूर्वी स्वत: बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.