सहकारी बँकांनी उद्योजकता विकासावर भर द्यावा

By admin | Published: April 19, 2016 04:09 AM2016-04-19T04:09:55+5:302016-04-19T04:09:55+5:30

सहकारी बँकांमुळे लाखो शेतकरी, गरिबांना आधार मिळालेला आहे. सहकारात प्रचंड शक्ती असून, या माध्यमातून सामाजिक व आर्थिक प्रगती शक्य होते.

Co-operative banks should focus on entrepreneurship development | सहकारी बँकांनी उद्योजकता विकासावर भर द्यावा

सहकारी बँकांनी उद्योजकता विकासावर भर द्यावा

Next

नागपूर : सहकारी बँकांमुळे लाखो शेतकरी, गरिबांना आधार मिळालेला आहे. सहकारात प्रचंड शक्ती असून, या माध्यमातून सामाजिक व आर्थिक प्रगती शक्य होते. तथापि, या बँकांनी केवळ कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता समाजात उद्योजकतेचा विकास कसा होईल यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व खासदार विजय दर्डा हे होते.
या वेळी नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, सहकारी बँकांचे ‘नेटवर्क’ चांगले आहे व त्यांच्याच प्रयत्नांमुळे सावकारांच्या मनमानीवर नियंत्रण आले आहे.
सहकारी बँकांनी नक्कीच नफा कमविला पाहिजे. परंतु समाजाला वैचारिक भूमिका देण्यासाठीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. बदलते आर्थिक चित्र लक्षात घेता
व्याजदर कमी व्हावा, ही जनतेची अपेक्षा आहे.
येणारा काळ हा सहकारी संस्थांसाठी कठीण आहे. परंतु हे आव्हान स्वीकारून या संधीचे सोनेदेखील करता येऊ शकते. सहकारी संस्थांनी गरिबांना मदतीचा हात दिला तर जनतेचा विश्वास संपादन होऊ शकेल; शिवाय प्रगती करणाऱ्या संस्थांनी बुडणाऱ्या संस्थांना आधार दिला तर विदर्भात सहकार आणखी वाढेल.
बँकांना वर आणण्यासाठी संबंधित कायद्यातदेखील काही बदल आवश्यक आहेत, असेदेखील गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Co-operative banks should focus on entrepreneurship development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.