सहकारी संस्था निवडणूक; स्थगिती लवकरच उठणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:56 AM2021-08-10T06:56:59+5:302021-08-10T06:57:11+5:30
राज्यातील सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या, नागरी सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी प्रक्रिया संस्था, खरेदी - विक्री संघ, औद्योगिक सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार
मुंबई : राज्यातील हजारो सहकारी संस्थांच्या निवडणुकीला सध्या असलेली स्थगिती उठविण्यात येणार आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.
सहकार विभागाच्या अधिकृत सुत्रांनी सांगितले, या संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत दिलेली स्थगिती १ सप्टेंबरपासून उठविली जाईल. यापूर्वी दर तीन महिन्यांनी निवडणुकांना स्थगिती देण्याबाबतचे आदेश सहकार विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढले होते. मात्र, आता स्थिती नियंत्रणात असल्याने या निवडणुकांना आणखी स्थगिती दिली जाणार नाही. त्यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या, नागरी सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी प्रक्रिया संस्था, खरेदी - विक्री संघ, औद्योगिक सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यात सुमारे ६० हजार सहकारी संस्थांची मुदत संपूनही स्थगितीमुळे निवडणुका घेता आलेल्या नाहीत.
बँकांचीही निवडणूक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक स्थगितीनंतरची पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने सोमवारी काढले. त्यामुळे १५ जिल्हा बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यात पुणे, लातूर, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे.